Ratnagiri News : पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार

अडूर येथे भक्तिरंगात उत्सवाची दिमाखदार सांगता
Ratnagiri News
पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार
Published on
Updated on

गुहागर शहर : कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाच्या निमित्ताने अडूर गावात ग्रामदेवता श्री सुंकाई देवी यांच्या होलिकोत्सवातील पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

फाल्गुन पंचमीपासून सुरू झालेल्या या उत्सवात चतु:सीमेतील कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांत देवीच्या खेळ्यांची भोवनी पार पडली. त्यानंतर भाटी मैदानावर रात्री आयोजित धार्मिक कार्यक्रमात संकासुराने पेटत्या होमाभोवती प्रदक्षिणा घालत भक्तांचा पाठलाग करण्याची पारंपरिक प्रथा सादर केली. होमाला अग्नी दिल्यानंतर संकासुराने ज्वलंत निखाऱ्यांतून धावत उपस्थितांमध्ये थरार निर्माण केला. या वेळी ‌‘जय देवी सुंकाई‌’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संकासुराला चिडवणाऱ्या भक्तांचा तो पेटत्या होमातून पाठलाग करतो आणि पकडल्यावर भक्त त्याचा नमस्कार करून आशीर्वाद घेतात, अशी आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी जिल्हा व परजिल्ह्यातून मोठी गर्दी उसळली होती.

पिढ्यान्‌‍ पिढ्या सुरू असलेल्या या परंपरेत आजवर कोणतीही अपघाताची घटना घडलेली नसल्याने ग्रामदेवतेवरील श्रद्धा अधिक दृढ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संकासुराचा पारंपरिक वेश, कंबरेतील घुंगरांचा नाद आणि मृदुंगचकव्याच्या तालावर सादर होणारी लोककला यामुळे कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण लाभले.

यंदा या सोहळ्याची माहिती सोशल मीडियासह विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्याने विक्रमी गर्दी झाली. मुंबई, पुणे तसेच रत्नागिरी जिल्हा परिसरातील राजापूर ते मंडणगड या तालुक्यांमधूनही अनेक भाविक व युट्यूबर्स विशेष उपस्थित राहिले होते. मात्र प्रचंड गर्दीमुळे आणि नियोजनावर आलेल्या ताणामुळे काहींना प्रत्यक्ष संकासुराचा थरार अनुभवता आला नाही. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली, तर मोबाईल नेटवर्कवर ताण आल्याने इंटरनेट सेवा काही काळासाठी ठप्प झाल्याचेही दिसून आले. श्रद्धा, धैर्य, लोकपरंपरा आणि सामुदायिक एकोप्याचे दर्शन घडविणारा पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा हा अनोखा सोहळा यंदाही दिमाखात व भक्तिरंगात संपन्न झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news