

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या अवैध एलईडी प्रकाशातील मासेमारीविरोधात कारवाई करण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सहाय्यक आयुक्त महेश देवरे आणि उपायुक्त नागनाथ भादुले यांनी कारवाईत कोणतीही शिथिलता न ठेवता नियमित गस्त घालण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कारवाईची तयारी करण्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारी दिवसभर धावपळ सुरू होती.
जिल्ह्यात गस्तीसाठी आवश्यक असलेली ‘रामभद्रा’ नौका अद्याप उपलब्ध नसल्याने कारवाईसाठी खासगी नौका मिळवण्याचे प्रयत्न विभागाकडून सुरू होते. जिल्हा कार्यालयांतर्गत स्वतंत्र पथक स्थापन करून रविवारपासून नियमित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्याचे सचिव राजेश अगरवाल यांनी शनिवारी दापोलीतील हर्णे जेटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत, परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्यासह जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानंतर सहाय्यक आयुक्त महेश देवरे यांनी कारवाईसाठी पथक तयार करून कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. उपायुक्त नागनाथ भादुले यांनीही कारवाई नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कारवाईकडे लक्ष लागले आहे.
मत्स्य व्यवसायमंत्री आज घेणार आढावा
मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे सोमवारी एलईडी मासेमारीविरोधातील कारवाईचा आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी आवश्यक माहिती तयार ठेवण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त महेश देवरे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे कारवाईचे नियोजन, गस्तीची व्यवस्था आणि संबंधित माहिती संकलित करण्यासाठी विभागातील अधिकारी कामाला लागले आहेत.