

जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : लाडक्या गणरायाचे अवघ्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आगमन होणार आहे. या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई तसेच अन्नपदार्थांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. सणासुदीत अन्न पदार्थ भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई व अन्न पदार्थ मिळावे म्हणून एकापथकाची नेमणूक करून विशेष मोहिम हाती घेतली आहे. मिठाई विक्रेते, उत्पादक, महामार्गावरील तात्पुरते स्टॉल, हॉटेलची आता पथकाच्यावतीने तपासणी होणार आहे. त्यामुळे खबरदार...गौरी गणपतीसह पुढे येणार्या सणात भेसळ केल्यास अन्न व औषध विभागाच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या श्रावण महिना सुरू असून लवकरच लाडक्या गणरायाचे, गौरीचे आगमन होणार आहे. त्यानिमित्त आता रत्नागिरीतील बाजारपेठा सजू लागल्या आहेत. तसेच मिठाईसह विविध अन्न पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. विविध मिठाईसह खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्य दुग्धजन्य पदार्थांची खरेदी होत असते. सणामुळे विविध मिठाई,पदार्थांची मागणी वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याचे प्रमाण असते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न व औषध विभाग सतर्क झाले असून अन्न पदार्थ विषयक कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून शहरासह ग्रामीण भागात तपासणीसाठी एका पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक जाऊन अन्न, मिठाईचे नमुने घेतील जर भेसळ आढळल्यास जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मिठाई, उत्पादक, विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांना दक्षतेसाठी आवाहन ही केले आहे.
अन्न पदार्थांच्या दर्जाविषयी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ते प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांम 1800222365 या क्रमांकावर करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.