

रत्नागिरी : शासकीय कामासाठी नागरिकांची अडवणूक करून लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक मोहीम सुरू ठेवली आहे. चालू वर्षातील जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांत ८ सापळ्यांमध्ये ११ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये एका खासगी मध्यस्थाचाही समावेश आहे.या कारवायांमध्ये महसूल विभागातील सर्वाधिक ६ जणांवर कारवाई झाली आहे. त्यापाठोपाठ पोलिस, पाटबंधारे आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाईचा बडगा उगारला आहे.
‘लाच’ला नाही म्हणा; एसीबीला कळवा!
शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी विनाकारण अडवणूक करून लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी दबावाला बळी न पडता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे. लाच मागणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे; मात्र लाच देणेही कायद्याने गुन्हाच आहे. त्यामुळे नागरिकांनी भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता त्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाईल ठरू शकतो महत्त्वाचा पुरावा
लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी प्रसंगावधान राखून शक्य असल्यास ऑडिओ किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पुरावा नोंदवावा आणि एसीबीच्या अधिकृत पोर्टल अथवा मोबाईल ॲपवरील तक्रार सुविधेद्वारे माहिती द्यावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
“शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असेल तर नागरिकांनी घाबरू नये. लाच देण्यास स्पष्ट नकार देऊन तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा. भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई प्रभावी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे. तक्रारीसाठी संपर्कटोल फ्री : १०६४ व्हॉट्सॲप : ७०३८३९१०६४ दूरध्वनी : ०२३५२-२२२८९३ ८ महिन्यांत ११ जणांवर कारवाई झाली असली तरी ही संख्या भ्रष्टाचाराचे संपूर्ण चित्र दाखवत नाही. सरकारी कार्यालयात लाच मागितली जाते तेव्हा ‘आपले काम आहे, पैसे द्यावेच लागतील’ असा समज बाजूला सारून नागरिकांनी तक्रार करण्याचे धाडस दाखवले, तरच भ्रष्टाचाराची साखळी खऱ्या अर्थाने तुटू शकते.