

रत्नागिरी : आषाढी वारीसाठी लाखो वारकरी, भाविक पंढरपूरला लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. आषाढी वारी अवघ्या काहीच दिवसावर येवून ठेपली असून वारकरी, भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. राज्यातून तब्बल 5 हजार 300 बसेस विविध मार्गावरून धावणार आहेत. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी आगारातून 50 एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरीकरांनो, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी जास्तीत जास्त बुकींग करावे, असेही आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह इतर राज्यातील लाखो वारकरी, भाविक पंढरपूला जात असतात. आषाढी निमित्त पंढरपूरला जाणार्या भाविकांची गर्दी दरवर्षी वाढत चालली आहे. यंदाही भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक पंढरपूला जात असल्यामुळे वारकरी, भाविकांचा प्रवास सुखकर, चांगला व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने यंदाही 5 हजारहून अधिक एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आगारातूनही जादा बसेस सोडण्यासाठी नियोजन सुरू असून अंदाजे 50 एसटी बसेसचे नियोजन केले आहे. अद्याप किती बसेस धावणार आहेत याचा निर्णय झालेला नाही. मागील वर्षी 30 बसेस पंढरपूला धावले होते.यंदाही जास्तीत जास्त एसटी बसेस उपलब्ध करण्याचे नियोजन आगाराने केले आहे. वारकरी, भाविकांनी तिकीट बुकींग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरी सायकलिस्ट संघटनेच्या काही भाविकांनी रत्नागिरी ते पंढरपूर असा सायकलीने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे, तर काही भाविकांनी पंढरपूरला पायी जाण्यास सुरूवातही केली आहे.
आषाढीवारीनिमित्त एसटी महामंडळाच्या वतीने यंदाही 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिला, 65 वर्षावरील नागरिकांसाठी अर्धे तिकीट असणार आहे. याचाही लाभ प्रवाशांनी घ्यावा असेही सांगण्यात आले.