

रत्नागिरी : जिल्ह्यात पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था खूप बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील १ ते ५ पट असलेल्या तब्बल ४२७ प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळेतील पटसंख्या वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. अन्यथा या शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या नव्या धोरणानुसार अत्यल्प पटसंख्येच्या शाळांचे समीपच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होवून विद्यार्थ्यांना ३ कि.मी.पर्यंत पायपीट करून दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने शाळा होत्या. गोरगरीब, कष्टकरी, कामगारवर्ग, शेतकरीवर्गातील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. मात्र आता खासगी शाळा, मोठ्या इमारती हे बघून गोरगरिब पालकही आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात शाळेत घालत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे.
पाच वर्षांतच १३१ जिल्हा परिषद शाळा कायमस्वरुपी बंद
मागील पाच वर्षांतच जिल्ह्यात १३१ जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्या आहेत. २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात २,४९४ शाळा होत्या, त्यात ७३ हजार २३९ विद्यार्थी शिकत होते. आता २०२५-२६ मध्ये शाळांची संख्या २,३६३ वर आली असून विद्यार्थी संख्या ५५ हजार ५९७ वर घसरली आहे. म्हणजेच पाच वर्षांत १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांकडे पाठ फिरवली आहे. त्यातच आता १ ते ५ पट असलेल्या आणखी ४२७ शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आहे.
दूर्गम वाड्या-वस्त्यांमध्येयाच शाळा शिक्षणाचा एकमेव आधार
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, एका शिक्षकामागे ५ पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. अशा शाळा एक ते दोन किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळेत विलीन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये हीच शाळा शिक्षणाचा एकमेव आधार असल्याने पालक आणि शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या ४०० शाळांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले असून लवकरच समायोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने दर्जा याकडे लक्ष देणे गरजेचे
शिक्षक कमी असल्यामुळे तसेच शाळांची दुरवस्था, पालकांचा खासगी शाळांकडे वाढलेला कल यासह विविध कारणांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. जर शाळा बंद झाल्यास त्या मुलांना जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील मुलांना ३ कि.मी.पर्यंत पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आणखी गळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळा बंद करण्याऐवजी शिक्षकांची संख्या वाढवा, शाळा दुरूस्त करा, दर्जा सुधारा आपोआप संख्या वाढेल, अशीच प्रतिक्रिया पालक देत आहेत.