

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिर्या-अलावा समुद्रकिनारी 42 फुटांचा मृत व्हेल मासा आढळून आला. पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतील हा मासा काही महिन्यांपूर्वी मृत झाला असावा, असा अंदाज स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला. हा मासा किनार्यावर आढळून आल्यावर शुक्रवारी समुद्रकिनारीच त्याला पुरण्यात आले.
मिर्या-अलावा किनारी गुरुवारी सायंकाळी दुर्गंधी येत होती. त्यामुळे परिसरात राहणार्या रहिवाशांनी किनारी जाऊन पाहणी केली असता, 42 फुटांचा मृत मासा दिसून आला. मासा पूर्णपणे सडल्याने दुर्गंधी पसरली होती. वर्षभरात यापूर्वी मालगुंड, रत्नागिरी आणि गणपतीपुळे किनार्यावर मृत व्हेल माशांचे अवशेष सापडले होते. शुक्रवारी किनार्यावर आलेल्या मृत व्हेल माशाचे सडलेले अवशेष किनार्यावरील वाळूत खड्डा खणून पुरण्यात आले. यावेळी कांदळवन कक्षाचे क्षेत्रपाल किरण ठाकूर आणि कांदळवन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.