Ratnagiri Teacher Recruitment : मराठीच्‍या १९९ शिक्षकांना समुपदेशनानंतर दिले नियुक्‍तीपत्र

३ उमेदवारांची अनुपस्थिती; दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेने गाठला निर्णायक टप्पा
Ratnagiri Zilla Parishad
Ratnagiri Zilla Parishad
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेने सोमवारी निर्णायक टप्पा गाठला. दिवाळीनंतर प्रतीक्षेत असलेल्या मराठी विषयाच्‍या २०२ शिक्षकांच्या समुपदेशनाला अखेर मुहूर्त मिळाला असून, सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. या समुपदेशनास १९९ उमेदवार उपस्थित राहिले, तर ३ उमेदवार अनुपस्थित होते. उपस्थित सर्व १९९ शिक्षकांना प्रशासनातर्फे तत्काळ नियुक्तीपत्र आदेश सुपूर्द करण्यात आले.

​जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या प्रक्रियेसाठी सर्व उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने यापूर्वीच केले होते. त्यानुसार सकाळपासूनच उमेदवारांची सभागृहात मोठी गर्दी झाली होती.

​निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार शाळांची निवड करण्याची संधी देण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणाली आणि पडताळणीद्वारे पारदर्शकपणे राबविल्याने उमेदवारांनी यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, तसेच विविध तालुक्यांचे विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते.

निवड झालेल्या सर्व १९९ शिक्षकांना जाग्यावरच नियुक्तीपत्रे देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद ओसंडून वाहत होता. या नवीन शिक्षकांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरून निघण्यास मोठी मदत होणार असून, ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेला निश्चितच चालना मिळणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.