

चिपळूण : येथील माजी आमदार रमेश कदम यांनी अखेर पक्षातील निराशाजनक वातावरणाला कंटाळून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राजीनामा दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांची वाटचाल अजित पवार राष्ट्रवादी की शिवसेना हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच माजी आ. कदम यांनी दिलेल्या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाने एक खंदे नेतृत्व पुन्हा एकदा गमावले आहे. श्री. कदम यांनी पक्ष सदस्यत्वासह प्रदेश उपाध्यक्ष पदाचादेखील राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला आहे. या राजीनाम्यात त्यांनी पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. चिपळूण न. प. निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना देखील पक्षाने आपल्याकडे फारसे लक्ष दिले नाही व दखल घेतली नाही. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपण आघाडीतील घटक पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यावेळी वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
1984 पासून आपण काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार यांच्यासोबत काम केेले आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर मंडणगडपासून राजापूरपर्यंत राष्ट्रवादी वाढविण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी जे-जे हवे ते सर्वकाही केले. मात्र, आता पक्षात कार्यकर्ते व नेत्यांना किंमत राहिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा निराशानजक परिस्थितीत पक्षात काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे रमेश कदम यांचे म्हणणे आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावरच त्यांचा राजीनामा समोर आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी काळात निवडणुकांच्या तोंडावर ते कोणता निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.