

जान्हवी पाटील, रत्नागिरी
कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. योगेश कदम यांच्या विरोधात भास्कर जाधवांनी काही दिवसांपूर्वी भरसभेत उमेदवारच जाहीर केला. जेवढा निधी आमदार म्हणून दापोली विधानसभा मतदारसंघात आणतो, त्यापेक्षा जास्त निधी यापुढे गुहागर मतदारसंघात देणार, असे मंत्री योगेश कदम म्हणाले. मंत्री योगेश कदम यांचा गुहागर मतदारसंघातील हस्तक्षेप भास्कर जाधव यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
गुहागरमधल्या मेळाव्यात योगेश कदम यांच्या विरोधात भास्कर जाधवांकडून कुणबी उमेदवार जाहीर करण्यात आला. आमदार व्हायचे आहे, तर दापोली मतदारसंघात कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असे समजा, असे भास्कर जाधव यांनी सहदेव बेटकर यांना सांगितले आहे. सहदेव बेटकर हे 2019 मधील भास्कर जाधवांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असून सध्या शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
पावसाळी अधिवेशनात उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी शिंदेसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारवरून गदारोळ केला होता. या मुद्द्यावरून योगेश कदम अडचणीत आले होते. इथूनच उद्धव सेना व शिंदे सेनेत वादाची ठिणगी पडली. त्यानंतर योगेश कदम यांनी आता गुहागर मतदारसंघात जास्त लक्ष घालणे सुरू केले आहे. योगेश कदम यांचा गुहागरमधील वाढता हस्तक्षेप भास्कर जाधव यांना खटकत असून यावरून त्यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. दररोज एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी केली जात आहे.
2009 मध्ये गुहागर मतदारसंघातून रामदास कदम हे पराभूत झाले होते. त्यावेळी भास्कर जाधव राष्ट्रवादी पक्षात होते. त्यावेळचा पराभव अजूनही रामदास कदम यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी आता गुहागर मतदारसंघात लक्ष घालणे सुरू केले. गुहागरमध्ये शिंदे सेनेचा मेळावा काही दिवसांपूर्वी झाला. त्यानंतर रामदास कदम आणि योगेश कदम ऐकमेकांच्या मतदारसंघांत अधिक प्रभावीपणे लक्ष घालत आहेत. 2009 मध्ये झालेल्या पराभवानंतर हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ही सगळी खेळी खेळली जात असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे आ. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागले आहे. रामदास नव्हे बामदास कदम, तो ठार येडा झालाय.., असे म्हणत भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. 30 वर्षे बार चालवणार्या रामदास कदम यांना लाज वाटली पाहिजे. रामदास कदम यांच्या मी कधी पाया पडलो नाही; पण ते विधानभवनाच्या लॉबीमध्ये माझ्या पाया पडलेत. भास्कर जाधव एकवेळ मरेल; पण तुमच्या पाया पडणार नाही. लवकरच आपले सरकार येणार आहे आणि मी मंत्री होणार आहे. मंत्री नाही झालो, तर येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होणार, असे सूतोवाच भास्कर जाधव यांनी केले.
एकूणच या सर्व घडामोडी पाहता उद्धव सेनेचे भास्कर जाधव आणि शिंदे सेनेचे रामदास कदम यांचा वाद मिटणार की अधिक चिघळणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.