Ramdas Kadam | ‘लोटे एमआयडीसी म्हणजे भास्कर जाधवांचा कौटुंबिक कारखाना!’ : रामदास कदम यांचा स्फोटक हल्ला

भरणे नाक्यावर प्रचार कार्यालय उद्घाटनात आमदार भास्कर जाधवांवर घणाघाती टीका
Ramdas Kadam
खेड: भरणे येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते रामदास कदम. (छाया: अनुज जोशी)
Published on
Updated on

खेड: “नगरपालिकेत ज्या पद्धतीने २१ च्या २१ जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला, त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये खेड तालुक्यातील सर्वच्या सर्व २१ जागांवर शिवसेनाच विजयी होणार,” असा ठाम आणि आक्रमक दावा शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला.

खेड तालुक्यातील भरणे नाका येथे शिवसेनेच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना रामदास कदम यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर लोटे एमआयडीसीतील कथित कॉन्ट्रॅक्टबाजीवरून अक्षरशः तोफ डागली. “मी देखील पर्यावरण मंत्री होतो, पण माझ्या आयुष्यात मी किंवा माझ्या कुठल्याही नातेवाईकांनी लोटे एमआयडीसीत एकही कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही. मात्र आज लोटे एमआयडीसी म्हणजे भास्कर जाधवांचा कौटुंबिक कारखाना बनला आहे,” असा थेट आरोप रामदास कदम यांनी केला.

कदम पुढे म्हणाले, “लोटे एमआयडीसीमधील कंपन्यांवर भास्कर जाधव यांच्या मुला-जावयांची नावे बॅनरवर झळकताना दिसत आहेत. जनतेच्या विकासासाठी असलेले कॉन्ट्रॅक्ट स्थानिक तरुणांना देण्याऐवजी ते आपल्या कुटुंबाला वाटले जात आहेत. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे.”

“आपण कधीही सूडाचे राजकारण केले नाही. ‘जिसने वोट दिया उसका भी भला, नहीं दिया उसका भी भला’ हेच आमचे धोरण आहे. पण सध्या गुहागर मतदारसंघात सूडाचे राजकारण सुरू असून जनता त्याचा हिशेब चुकता करणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

या सभेत राजकीय भूकंप घडवत गुहागर विधानसभा मतदारसंघातील सात्विनगाव जोशीवाडी येथील संपूर्ण गावाने रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच दापोली पंचायत समितीचे माजी सभापती पप्पू गुजर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. यासोबतच खेड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असंख्य कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले.

या घडामोडींमुळे खेड आणि गुहागर तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news