

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोकणातील शेतकऱ्यांच्या आंबा पिकाला ९० टक्के फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट, तट, पक्ष, राजकारण सोडून एकत्र आले पाहिजे. तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. सरकारने एका आंबा कलमाला ५ हजार रूपये, काजूसाठी हेक्टरी ३ लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी.
शेतकऱ्यांनो तुम्ही आता निर्धाराने लढायला शिका, केसेस झाल्या तर होवू द्या, महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्या मागे उभा करतो, आता मागे हटू नका, रडू नका, लढत रहा, गरज पडल्यास रस्त्यावर उतरा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नैसर्गिक आपत्तीबाबतच्या तुटपुंजी मदत तसेच आंबा, काजू उत्पादक व मच्छीमार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी मंगळवारी रत्नागिरीत आले होते. यावेळी शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या अडचणी, मागण्या ऐकून घेतल्या. शेट्टी म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील आंबा, काजूचे नुकसान निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे.
वाढते औद्योगिकरण व हवामान बदलामुळे कोकणातील भात शेती नष्ट झाली आहे. अशीच परिस्थिती दोन वर्षे राहिली तर भातशेतीबरोबरच आंबा, काजू शेती नष्ट होवून हापूस आंबा दुर्मीळ होईल. त्यामुळे कोकणातील कृषी पर्यटन, रोजगार निर्मितीसाठी लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी माजी आमदार बाळ माने, विवेक भिडे, प्रकाश साळवी, राकेश सावंत, संतोष चव्हाण, दीपक सुर्वे, स्मिता देसाई, अमृत पोफडे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा, काजू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
२ एप्रिलला मुंबईत आंबा व्यापाऱ्यांची बैठक
कोकणात आंबा उत्पादन कमी असताना मुंबईतील व्यापारी आंब्याचे दर का पाडतात? उत्पादन कमी असले तर दर जास्तीने घेणे गरजेचे आहे. दरवाढ घेण्याची ही संधी आहे. येत्या २ एप्रिलला मुंबई येथील आंबा व्यापाऱ्यांची बैठक घेणार आहे. त्यामुळे याठिकाणी कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, सर्वानी मिळून दरवाढ घेवुया, असे आवाहन शेट्टी यांनी केले.