

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्रवासी प्रतीक्षालयाचे सिलिंग मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्याचवेळी मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस स्थानकात येणार असल्याने प्रतीक्षालयात थांबलेले सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर गेले होते. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, अन्यथा सिलिंगखाली प्रवासी अडकून मोठी दुर्घटना घडली असती.
घटनेनंतर स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.कोसळलेल्या सिलिंगखाली कोणी अडकले नाही ना, याची तातडीने खातरजमा करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच कोसळलेल्या सिलिंगच्या दुरुस्तीसाठी यंत्रणा तत्काळ कामाला लावण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने स्थानकावरील विकासकामांच्या दर्जाबाबत प्रवासी व नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजापूर रोड रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्यात आले होते. या कामांमुळे स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला असला, तरी काम सुरू असतानाच एकदा छप्पर कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळीही बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
आता पुन्हा प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळल्याने त्या शंकांना अधिक बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम पूर्ण होऊन अवघी दोन वर्षे उलटली असताना अशी घटना घडल्याने कामाच्या दर्जाबाबत आणि देखभाल व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो रुपये खर्चून करण्यात आलेल्या विकासकामांची गुणवत्ता नेमकी कितपत सक्षम आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच स्थानक परिसरातील सर्व बांधकामांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रेल्वे प्रवासी, नागरिक आणि स्थानिक स्तरातून पुढे येत आहे. एका मोठ्या दुर्घटनेतून प्रवासी थोडक्यात बचावल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.