

राजापूर : राजापूर तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, पाचल आणि खरवतेनंतर आता ओणी-कोंडिवळे येथील गोतावडेवाडीत घरफोडीची घटना घडली आहे. या चोरीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. तालुक्यात वारंवार घडणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.
ओणी-कोंडिवळे येथील गोतावडेवाडीतील शामसुंदर गजानन शेट्ये यांच्या राहत्या घरी २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ९.४५ या वेळेत ही चोरी झाली. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने मागील दरवाजाची कडी आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले ८७ हजार ७६५ रुपये किमतीचे १२.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २१ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत पाचल आणि खरवते येथेही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता गोतावडेवाडीत चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील काही महिन्यांतील घरफोड्यांमधील आरोपींचा शोध अद्याप लागला नसल्याचे चित्र असून, वाढत्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान राजापूर पोलिसांसमोर आहे.