राजापूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र सदन येथे आयोजित कोकण हापूस आंबा महोत्सवात राजापूरच्या हापूस आंब्याने दिल्लीकरांची अक्षरशः मने जिंकली. कोकणच्या सुपीक मातीत पिकलेल्या सुगंधी, रसाळ आणि दर्जेदार हापूसला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की, अवघ्या तीन तासांत तब्बल एक हजार डझन आंब्यांची विक्री झाली.
राजापूर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा महोत्सव मोठी संधी ठरला. सकाळपासूनच महाराष्ट्र सदन परिसरात आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. अनेक दिल्लीकरांनी हापूसची चव चाखत त्याच्या गोडव्याचे आणि अप्रतिम सुगंधाचे कौतुक केले. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या राजापूर हापूसने आपल्या उच्च दर्जाची छाप पुन्हा एकदा उमटवली.या महोत्सवामुळे कोकणातील शेतकऱ्यांना थेट राजधानीत बाजारपेठ मिळाली असून त्यांच्या उत्पादनाला योग्य दरही मिळत आहे. विशेष म्हणजे, ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संपर्क निर्माण झाल्याने दर्जेदार फळांचा पुरवठा अधिक सुलभ झाला आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ओंकार प्रभुदेसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांनी नियोजनबद्ध समन्वय साधत या महोत्सवाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. या उपक्रमामुळे हापूसची ख्याती देशभर अधिक बळकट होत असून भविष्यात अशा महोत्सवांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.