

रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दरम्यान, येत्या काही तासांत रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह मोठा पाऊस पडण्याचा इशारा मुंबई येथील हवामान विभागाने दिला आहे.
मे महिन्यात रत्नागिरी शहर, जिल्ह्यात उकाड्याने हैराण होत आहेत. दुपारी डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल लावून जात आहेत. अशी परिस्थिती असताना पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात पावसाने थैमान घातले आहे. सोलापुरात तर काही भागात पावसाने पाणी घरात शिरले आहे. दुसरीकडे कोकणात ही मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरासह राजापूर, लांजा, चिपळूण, पावस, संग्मेश्वर या तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपले होते. त्यामुळे कित्येक तालुक्यातील रस्त्यांची दैना झाली आहे. काही ठिकाणी अपुर्या रस्त्यांमुळे रस्ते चिखलमय झाले होते. मुंबई-गोवा, मिर्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामेही अद्याप पूर्ण झालेली नाही त्यामुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. शहरात सिमेंटचा रस्ता झाला मात्र साईडपट्टी तशीच ठेवली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी पावसामुळे कित्येक ठिकाणी झाडे कोसळली तर लांज्यात वीज पडून एकाचा मुत्यू झाला असून राजापुरात वीज कोसळून दोघे जखमी झाले आहेत. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
26,27 जूनला हाय टाईड
मे च्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा कोकण किनारपट्टीवर समुद्राला 18 दिवस मोठी भरती असून धोक्याचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. दि. 26, 27 जूनला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती अनुभवता येणार आहे.