

Ratnagiri Raghuveer Ghat Landslide
खेड : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील रघुवीर घाट ढासळू लागल्याने वाहनधारकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या घाटात दररोज शेकडो वाहने व हजारो पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, घाटाचा रस्ता हजारो मीटर खोल दरीच्या बाजूने कोसळू लागल्याने वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक ठरू लागला आहे.
घाटामध्ये कोणत्याही ठिकाणी सुरक्षा कठडे, इशारा फलक वा तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
रघुवीर घाट हा सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्याला थेट कोकणाशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. १९९०-९१ मध्ये या घाटाचे काम खेड तालुक्यातील खोपी गावातून सुरू करण्यात आले होते. १९९३ मध्ये घाटाचे काम पूर्ण झाले व शिंदी, वळवंण, आरव, मोरणी, उचाट, वाघीवळे, लामज, निवळी, अकल्पे, गाडीवली आदी सुमारे २० ते २५ गावांचा संपर्क कोकणाशी पुन्हा प्रस्थापित झाला.
या मार्गावर खेड-उचाट-अकल्पे बस सेवा २००२ मध्ये सुरू झाल्याने दळणवळणाच्या दृष्टीने मोठा बदल झाला. सुमारे १२ किमी लांबीचा हा घाट सह्याद्रीतील सर्वात उंच घाटांपैकी एक असून, याची उंची चार हजार मीटर असून ७ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका सतत असतो.
सद्यस्थितीत घाटाचा काही भाग कोसळू लागल्याने नागरिक व पर्यटक दोघांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. घाटाची दुरवस्था लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांतून होत आहे.