

खेड : कोकणातील लोटे औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी 5 रोजी असगणी गावात मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. यावेळी शेकडो ग्रामस्थ काळे झेंडे हाती घेऊन रस्त्यावर उतरले आणि कंपनीविरोधात त्यांनी लोटे औद्योगिक वसाहतून शांततेत मुक मोर्चा काढला.
हा मोर्चा तालुक्यातील असगणी ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू होऊन औद्योगिक क्षेत्रातून फेरफटका मारत पुन्हा ग्रामपंचायतीसमोर येऊन संपला. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर फूड वर्कर्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली असगणी ग्रामपंचायतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. ग्रामस्थांचा इशारा - भूमिपुत्रांना न्याय न दिल्यास आंदोलन उग्र रूप धारण करेल. या आंदोलनात ग्रामस्थांनी प्रकल्पातील नोकरभरती प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील लोकांना नोकर्या दिल्या जात असल्याची आमची स्पष्ट नाराजी आहे, असे मत असणगी येथील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.
कोका कोला कंपनीचा कोकणातील हा एक मोठा औद्योगिक प्रकल्प असल्याने कारखाना होणार म्हटल्यावर स्थानिकांमध्ये रोजगाराच्या संधीबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याची भावना निर्माण झाली असून, येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमच्या गावातील तरुण बेरोजगार आहेत. कोका कोला कंपनीकडून स्थानिकांना कामाची संधी मिळणे गरजेचे आहे.भूमिपुत्रांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे, अन्यथा ग्रामस्थांच्या भावना उद्रेक होऊ शकतात, असे सरपंच संजना बुरटे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केले.