

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील बांधण्यात येत असलेली काही भागाची गॅबियन वॉल व संरक्षण नेट काही ठिकाणी कोसळली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर दरड कोसळण्याचा धोका संभवत असून घाटाखाली असणार्या पेढे येथील लोकवस्तीमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पेढे ग्रामस्थांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणीदेखील केली.
परशुराम घाटात गेली काही वर्षे सातत्याने दरडी कोसळत आहेत. या शिवाय घाट रस्ता खचून मुंबई-गोवा महामार्गावर अडथळा निर्माण होत आहे. गतवर्षीदेखील दरड कोसळून महामार्ग काही काळ ठप्प होता. त्यामुळे यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने उत्तराखंड येथील कंपनीचे मार्गदर्शन मागितले. त्यांनी सर्वेक्षण करून कोट्यवधीचे कामदेखील सुरू झाले. यावर्षीच्या उन्हाळ्यात घाटातील टेकडीवर संरक्षक नेट मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
कोकण रेल्वेच्या धर्तीवर घाटामध्ये दरडीच्या ठिकाणी संरक्षक नेट व घाटाच्या खालच्या बाजूला गॅबियन वॉल बांधण्यात आल्या आहेत. हे काम जूनच्या 15 तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, पाऊस आधीच झाल्यामुळे घाटातील अपूर्ण असलेल्या गॅबियन वॉल व संरक्षक नेट काही ठिकाणी कोसळल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता पंकज गोसावी यांना विचारले असता ते म्हणाले, परशुराम घाटात अतिवृष्टीत दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने गॅबियन वॉल व संरक्षक नेट बसविण्याचे काम सुरू केले. हे काम अंतीम टप्प्यात असतानाच पाऊस आल्याने अडचण निर्माण झाली. 15 जूनच्या आत हे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने अर्पूण अवस्थेतील काही ठिकाणी संरक्षक नेट आणि गॅबियन वॉल कोसळले आहेत. याची तज्ज्ञ समितीने पाहणी देखील केली आहे, असे गोसावी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.