

विठू सुकडकर
सासष्टी : कोकण रेल्वे महामंडळाने गेल्या 35 वर्षांत भरीव प्रगती केली आहे. महामंडळाकडून दरवर्षी नवीन प्रस्ताव अंमलात आणले जातात. यापुढे रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणासह नवीन पाच प्रस्तावित रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव मांडला असून यात गोव्यातील तीन स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोर्डवे (ता. कणकवली) येथे नव्याने रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. तर सिंधुदुर्ग ते रत्नागिरी या दरम्यान आणखी एका ठिकाणाचा समावेश आहे.
गोव्यात सारझोरा, नेवरा व मये येथे मिळून तीन नवीन रेल्वे स्थानके होणार असून रत्नागिरीपर्यंतही एक नवीन रेल्वे स्थानक होणार आहे. कोकण रेल्वे महामंडळाने वरील नवीन प्रस्तावित रेल्वे स्थानकांचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केलेला आहे. सरकारकडून अनुमती मिळाल्यानंतर नवीन रेल्वे स्थानकांच्या कामांना गती दिली जाणार आहे. कोकण रेल्वे महामंडळाने अलिकडेच उर्वरित रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावित कामासाठी भौतिकता वेळापत्रक निविदा जारी केली आहे. कंत्राटदार कंपनीकडून रेल्वे रुळांचे दुपदरीकरणचे सर्वेक्षण करून घेतले जाणार आहे. सदरची कंपनी भूसंपादन जागेचे प्रमाण तसेच रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण खर्चाचे अंदाजपत्रक महामंडळाला सादर करणार आहे. त्यानंतर कोंकण रेल्वे महामंडळ रेल्वे रुळांच्या दुपदरीकरण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार आहे. तसेच एक नवीन रेल्वे स्थानकांच्या बांधकामासाठी सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे महामंडळाने पाच नवीन रेल्वे स्थानके सुरू करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. त्यासाठी सुमारे 1500 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. महामंडळ ही नवीन रेल्वे स्थानके स्वखर्च व केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू करण्याच्या तयारीत आहे. तसेच कोकण रेल्वे महामंडळाचे एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानक 15 कि. मी. अंतरावर ठेवण्याचे नियोजन आहे.