

राजापूर : राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे शुक्लकाष्ट अद्यापही संपता संपत नसल्याने नागरिक व वाहनचालक चांगलेच मेटाकुटीस आले आहे. कुशे मेडिकलसमोरील खड्ड्यांवर उपाय म्हण्ाून बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉकचे कामही अर्धवट करण्यात आले आहे, तर मुख्य रस्त्यावरील आंबेडकर भवन, समर्थ नगर व जवाहर चौक या भागात पुन्हा मोठ्याप्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांसह वाहनचालकांच्या डोकेदुखीत नव्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
येथील नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने प्रशासकीय काळाच्या गेल्या अडीच-तीन वर्षांत शहरातील विकास कामांचा पुरता बट्ट्याबोळ उडवल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांचे कराचे पैसे हे शासनाच्या माध्यमातून विकास कामांच्या नावाखाली निधीद्वारे येत असताना वा येणार असताना त्याचा प्रत्यक्ष विनियोग कसा करायचा हे ठेकेदारच ठरवत असल्याने अशा विकासकामांचा थेट लाभ जनतेला होतो की नाही याची खातरजमा कोणीही करताना दिसून आलेले नाही. मुख्य रस्त्यावरील अर्धवट स्थितीत ठेवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाबाबतही हेच दिसून आले आहे. नगर परिषदेतील बांधकाम विभाग हा गेल्या अडीच-तीन वर्षांच्या प्रशासकीय काळात ठेकेदारांवर वचक ठेवण्यास निष्प्रभव फक्त बिले काढण्यासाठी अग्रेसर असल्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत.
अलिकडच्या काळात जकात नाका ते जवाहर चौक या दरम्यानच्या कुशे मेडिकलच्या दरम्याने न.प.च्या बांधकाम विभागामार्फत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम करण्यात आले. या कामातही नगर परिषदेने मोठाले खड्डे असलेला भाग वगळून हे काम परस्पर संपवले. त्यामुळे अशा कामाचा ना वाहनचालकांना उपयोग झाला ना आगामी गणेशोत्सव काळात नागरिकांना उपयोग होणार आहे. त्यामुळे या कामाचा तपशील कोणी ठरवला, असा सवाल केला जात आहे. न.प.च्या बांधकाम विभागात सध्या कंत्राटी कर्मचारी असून इंजिनियर पद असलेल्या अधिकार्यााशिवायच हा विभाग दामटवला जात असल्याच्या प्रचंड तक्रारी होत आहेत. अनेक ठेकेदार हे एकाचवेळी असंख्य कामांवर कब्जा करण्यासाठी धडपडताना दिसतात. मात्र, अनेक कामे यंदा अपूर्णावस्थेत आहेत. मात्र निद्रिस्त झालेला जराही बांधकाम विभाग हलताना दिसत नसल्याने व मुख्याधिकारी स्थितप्रज्ञ असल्याने नागरिकांतून प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या व अशा अनेक विषयांवरच यंदाची नगर परिषदेची निवडणूक लढवली जाण्याची शक्यता प्रकर्षाने वर्तवली जात आहे.