Ratnagiri News : गणेशोत्सव तोंडावर; खड्ड्यांच्या विळख्यात कोकणचे रस्ते!

ग्रामीण मार्गांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त, प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजनांची गरज
Ratnagiri News
गणेशोत्सव तोंडावर; खड्ड्यांच्या विळख्यात कोकणचे रस्ते!
Published on
Updated on

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई, पुण्यासह परगावातून हजारो चाकरमानी कोकणातील आपल्या गावाकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते अद्यापही खड्ड्यांच्या विळख्यात आहेत. पावसामुळे अनेक रस्ते ठिकठिकाणी उखडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात वाढणाऱ्या वाहनांची गर्दी आणि खराब रस्ते यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची डागडुजी पूर्ण करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने खासगी वाहने, एसटी, रेल्वे तसेच अन्य वाहनांनी कोकणात दाखल होतात. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसोबतच तालुका अंतर्गत रस्ते, गावांना जोडणारे मार्ग आणि घाटरस्त्यांवरही वाहनांची मोठी वर्दळ वाढते. अशा परिस्थितीत खड्डेमय रस्ते धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांतील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था झाली होती. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती आणखी गंभीर केली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडाही खचल्या असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार आणि वाहनचालकांसाठी हे खड्डे जीवघेणे ठरू शकतात.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीची आश्वासने दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. यंदा तरी प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीने निधी उपलब्ध करून खड्डे बुजवावेत, धोकादायक ठिकाणी डांबरीकरण करावे तसेच रस्त्यांच्या कडांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ नको. गणेशोत्सवापूर्वी सर्व ग्रामीण रस्ते वाहतुकीस सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news