

दापोली : दापोली शहरातील एका बेकरीतून ग्राहकाने घेतलेल्या बनपावात बुरशी आढळल्याचा प्रकार ताजा आहे.असे असताना आता दापोली शहरातील अन्न सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेकरी, स्वीटमार्ट, चायनीज सेंटर यांसारख्या अनेक ठिकाणी किळसवाणी अस्वच्छता असल्याच्या तक्रारी वाढत असून, या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.
पर्यटन तालुका म्हणून दापोलीची ओळख देशभरात आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. स्थानिक नागरिकांसह पर्यटकही बेकरीचे पाव, ब्रेड आणि विविध खाद्यपदार्थ खरेदी करतात. मात्र पावासारख्या दररोज वापरल्या जाणार्या अन्नपदार्थातच बुरशी आढळत असल्याने इतर खाद्यपदार्थांची गुणवत्ता किती सुरक्षित असेल? असा प्रश्न संतप्त ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी दापोली बसस्थानकाजवळील एका स्वीटमार्टमध्ये गुणवत्तेचा अभाव आढळल्याने ते दुकान दोन दिवस बंद ठेवावे लागले होते. तसेच एका ठिकाणी ढोकळ्यात आळी आढळल्याची घटना समोर आली होती. अशा प्रकारचे प्रकार आता शहरात वाढत असून, यावर कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे.
अन्न सुरक्षा तपासणारी यंत्रणा नेमकी कार्यरत आहे का? या दुकानांची तपासणी कोण करत आहे? असा सवाल नागरिकांकडून जोरात उपस्थित केला जात आहे. नगर पंचायत आणि अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करून शहरातील सर्व खाद्य विक्रेत्यांची तपासणी करावी, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.