

मुंबई : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेली नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर काढण्यात येणारा धडक मोर्चा पोलिसांनी गिरगाव चौपाटीवरच रोखला. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते विनायक राऊत आणि रासपचे महादेव जानकर यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आझाद मैदानात आणले.
आंबा उत्पादकांना हेक्टरी ५ लाख, तर काजू उत्पादकांना ३ लाख रुपये देण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ‘सरकार जर स्वतःच नियम आणि कायदे पायदळी तुडवत असेल, तर शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी सविनय कायदेभंग करण्यात गैर काय?’ असा संतप्त सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.
या मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलनाची सुरुवात होण्यापूर्वीच धरपकड सुरू केली. सायंकाळी चारच्या सुमारास खासदार अरविंद सावंत, आमदार बाळा नर, महेश सावंत, मनोज जामसुतकर, भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे शैलेंद्र कांबळे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
...अन्यथा ‘वर्षा’वर आंबे फेकून निषेध नोंदवू : विनायक राऊत
नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा आंब्याचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी घटले असून कोकणातील शेतकरी आधीच मोठ्या संकटात आहे. सरकारने तातडीने विशेष आर्थिक मदत न दिल्यास, मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर आंबे फेकून निषेध नोंदवू, असा थेट इशारा विनायक राऊत यांनी दिला. तर, कोकणातील आंब्याला संपवून इतर राज्यातील आंबे येथे आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप प्रकाश रेड्डी यांनी केला.
ठाकरेसेना आणि काॅंग्रेसने दिला होता पाठिंबा
या मोर्चाला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. ताब्यात घेतल्यानंतर सर्व आंदोलकांनी आझाद मैदानात ठिय्या देत ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अखेर सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानाची वेळ संपल्यानंतर सर्व आंदोलक तेथून बाहेर पडले.