

राजन लाड
जैतापूर : मालवणी रंगभूमीचा पाया रचणारे, मालवणी भाषा सातासमुद्रापार पोहोचवणारे, असंख्य कलाकारांना संधी देणारे आणि मराठी नाट्यजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ नाटककार ‘वस्त्रहरणकार’ गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. 27) रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मंगळवारी (दि. 28) सकाळी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक, रंगकर्मी, तसेच कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गातील शेकडो नाट्यप्रेमी आणि गवाणकरप्रेमी यांनी उपस्थित राहून या थोर नाटककाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांचे पार्थिव दहिसर (पूर्व) येथील निवासस्थानी नेण्यात आले. जिथे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र यांनी शेवटचा निरोप दिला. दहिसरच्या अंबावाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी पार पडला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्यासह मराठी रंगभूमीवरील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी यावेळी अॅड. शेलार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन हे त्यांचे मूळ गाव. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून ते उभे राहिले आणि लेखणीच्या जोरावर त्यांनी रंगभूमीवर देदीप्यमान स्थान मिळवले. 96 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले, तर झी मराठी जीवनगौरव पुरस्कारासह शेकडो पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला.
मागील काही वर्षांपासून ते आपल्या राजापूर तालुक्यातील माडबन येथील निवासस्थानी वास्तव्यास होते. या काळात त्यांनी तीन नवीन नाटके लिहून ती रंगमंचावर आणली, तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळवून दिली. त्यांचे मधुभाई कर्णिक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या प्रेमाखातर मोहन जोशी, डॉ. गिरीष ओक यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही त्यांच्या माडबन येथील निवासस्थानी भेट दिली होती. नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक संवेदनशील नाटककार, कलावंतांचा मार्गदर्शक आणि मालवणी संस्कृतीचा सच्चा प्रहरी गमावला आहे. त्यांच्या लेखणीचा प्रकाश आणि नाटकांची गंधर्व परंपरा कोकणाच्या आकाशात कायम झळकत राहील
नाटककार गवाणकर यांच्या लेखणीतून उभ्या राहिलेल्या ‘वेडी माणसे’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’, ‘वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’ आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर नवा अध्याय रचला. गवाणकर यांच्यावर पु. ल. देशपांडे यांचा प्रभाव होता. ‘पु. ल. देशपांडे यांच्या परिसस्पर्शाने माझ्या जीवनाचं सोनं झालं,’ असं ते नेहमी सांगत असत.