

भालचंद्र नाचणकर
रत्नागिरी : शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांचे प्रामाणिक काम केले जावे. शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करून निवडणूक लढवून विजयी झालेल्यांना वाजत-गाजत पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची योजना बंद झाली असल्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी त्यांच्या रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील निवासस्थानी बंद खोलीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्पष्टपणे सांगितले.
इच्छुक उमेदवारांची पालकमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानमंत्र दिले. प्रामाणिक काम करणार्यांचा स्वीकृत सदस्य पदासाठी विचार केला जाईल, असेही आश्वासन दिले आहे. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी पाली येथील निवासस्थानी सर्व इच्छुक उमेदवारांची बंद खोलीत बैठक घेतली. शिवसेना-भाजप युती होणार आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवाराचेच काम केले पाहिजे.
युतीमुळे इच्छुक सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार नसली तरी त्यांच्या निवडणुकीतील कामाची दखल घेऊन स्वीकृत नगरसेवक पदासाठी विचार केला जाणार आहे. प्रत्येक स्वीकृत उमेदवाराला एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. सभापती पदाचा कालावधीसुद्धा एक वर्षाचा असणार आहे. सभापती आणि स्वीकृत नगरसेवकाने एकाच वेळी आपल्या पदांचे राजीनामे द्यायचे असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी इच्छूकांना सांगितले.
बंडखोरी करून मैत्रीपूर्ण लढतीची नाटके चालणार नाहीत. बंडखोरी करून निवडून आले तरी त्यांना पक्षात प्रवेश मिळणार नाही. बंडखोरांचे वाजतगाजत पुन्हा पक्षात स्वागत करण्याची योजना बंद झाली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.इच्छुकांमध्ये माजी नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके, प्रितम आयरे, युवा नेते अभिजित दुडये यांच्या पत्नीसह अनेक उमेदवार उपस्थित होते. त्यामुळे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि राहुल पंडित यांना कोणत्या प्रभागातून सामावून घेतले जाते याकडे लक्ष लागले आहे.