Shankereshwar Temple : पेंडखळेचे शंकरेश्वर मंदिर ठरतेय इतिहास संशोधकांचे आकर्षण

कातळात कोरलेली रचना, प्राचीन शिल्पवैभव आणि मानवाकृती कातळशिल्पामुळे कोकणातील दुसरे कैलास म्हणून ओळख
Shankereshwar Temple
राजापूर : कातळात खोदलल्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या तर शेवटच्या छायाचित्रात कातळात
Published on
Updated on

शरद पळसुळेदेसाई

राजापूर : राजापूर तालुक्यातील पेंडखळे गावातील प्राचीन श्री शंकरेश्वर मंदिर सध्या इतिहास अभ्यासक आणि पुरातत्त्व रसिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. कातळात कोरलेली मंदिररचना, मध्ययुगीन शिल्पवैभव, विविध धार्मिक परंपरांचा संगम आणि परिसरात आढळलेले दुर्मिळ मानवाकृती कातळशिल्प यामुळे या स्थळाला “कोकणातील दुसरे कैलास” अशी ओळख मिळत आहे.

एका कातळातून साकारलेले मंदिर स्थानिक अभ्यासकांच्या मते, गोठणे-दोनिवडे मठवाडी येथील सोमेश्वर मंदिराप्रमाणेच शंकरेश्वर मंदिरही एका कातळातून वरून खाली खोदून तयार करण्यात आले असावे. मंदिरावर सध्या आधुनिक बांधकाम, प्लास्टर आणि स्लॅबचे आवरण असले तरी मागील बाजूस दिसणाऱ्या कातळाच्या रेषा आणि खोदकामाची शैली त्याचे मूळ कातळ-कोरीव स्वरूप स्पष्ट करतात.

मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पूर्वी कातळात खोदलेली विहीर होती. सध्या ती स्लॅबखाली झाकली गेली असली तरी तिच्या अस्तित्वाच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. डोंगरावर सापडले मानवाकृती कातळशिल्प मंदिराच्या मागील बाजूस कातळात कोरलेल्या पायऱ्यांद्वारे डोंगरावर जाता येते. या मार्गावर सुमारे दोन फूट आकाराचे मानवाकृती कातळशिल्प आढळते. दोन्ही हात पसरलेल्या अवस्थेतील ही आकृती स्थानिक ग्रामस्थ “वेताळ” म्हणून ओळखतात.

तज्ज्ञांच्या मते, हे शिल्प अश्मयुगीन असून त्याचा कालखंड सुमारे 10 ते 12 हजार वर्षांपूर्वीचा असू शकतो. यामुळे कोकणाच्या प्रागैतिहासिक इतिहासात महत्त्वाची भर पडल्याचे मानले जात आहे. बारव, वहाळ व जलव्यवस्थेचे प्राचीन नियोजन मंदिरासमोर कातळात खोदलेला वहाळ असून त्याची रचना गोठणे-दोनिवडे येथील सोमेश्वर मंदिराची आठवण करून देते. परिसरात भद्रा प्रकारातील मध्ययुगीन बारव असून त्यात वर्षभर पाणी टिकून राहते. शैव, वैष्णव, गणपत्य व शाक्त परंपरांचा संगममंदिर परिसरात विष्णू-लक्ष्मी-गरुड शिल्प तसेच रिद्धी-सिद्धीसह चतुर्भुज गणेशमूर्ती आढळते. अभ्यासकांच्या मते या मूर्ती इ.स. 10वे ते 12वे शतकातील शिलाहार-यादव कालखंडातील असाव्यात. शिवमंदिर, विष्णू शिल्प, गणेशप्रतिमा, पार्वती मूर्ती तसेच परिसरातील भवानी माता व ग्रामदेवता जाकादेवी मंदिर हे ठिकाण प्राचीन काळातील विविध पंथांचे एकत्रित आध्यात्मिक केंद्र असावे, अशी शक्यता व्यक्त होते.

स्थानिक आख्यायिकेनुसार, स्वयंभू शिवलिंगावर अभिषेक पात्रातून पाणी पडताना गर्भगृहात ‌‘सिंहनाद‌’ ऐकू येतो. रायपाटण संगनातेश्वर मंदिराप्रमाणेच येथेही हा अद्भुत नाद अनुभवता येत असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. माघ वद्य दशमी ते अमावस्या या कालावधीत येथे सहा दिवसांची मोठी यात्रा भरते.

परिसरात वीरगळ, सतीशिळा, भग्न शिवमंदिर, समाधीस्थळे तसेच शिवकालीन तलवार असल्याचे सांगितले जाते. याशिवाय तळेराई परिसरात मध्ययुगीन तळी, सतत वाहणारे पाणी आणि लहानसे एकाश्म मंदिरही आढळते. घनदाट जंगल आणि शांत वातावरणामुळे हा परिसर पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे.

कोकण किनारपट्टीवरील जांभ्या सड्यांवरील कातळशिल्पांना राज्य शासनाने वारसा दर्जा देऊन संरक्षण सुरू केले आहे. इतिहास संशोधकांच्या मते, पेंडखळे येथील शंकरेश्वर मंदिर, प्राचीन शिल्पे आणि मानवाकृती कातळशिल्प यांचा शास्त्रीय अभ्यास व संवर्धन झाल्यास कोकणाच्या प्राचीन इतिहासाचे अनेक नवे पैलू समोर येऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news