

रत्नागिरी : 1 जूनपासून राज्यात पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. या काळात समुद्रातील माशांचे प्रजनन व्यवस्थित व्हावे, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. या बंदीदरम्यान अवैध मासेमारी होऊ नये, यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग गस्ती नौकांच्या माध्यमातून समुद्रात गस्त घालत असतो. मात्र, सहायक मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका रविवारपासून बंद होणार आहे.
पावसाळी मासेमारी बंदी सुरू झाल्यानंतर रामभद्रा गस्ती नौकेला बंदी कालावधीत मासेमारी करताना एकही नौका आढळली नाही. त्यामुळे मासेमारी नौकांनी बंदी कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात धाडस केले नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी, पावसाळी मासेमारी बंदी 1 जूनपासून सुरू होत असली तरी, पर्ससीन नेट मच्छिमार नौका 10 मे पासूनच बंदरावर परतण्यास सुरुवात करतात. काही पर्ससीन आणि इतर पारंपरिक नौका 31 मे च्या मध्यरात्रीपर्यंत मासेमारी करतात. परंतु यावर्षी मे महिन्याच्या मध्यालाच वातावरण बदलले आणि जोरदार वारे व मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिल्यानंतर, अनेक नौका वेळेआधीच किनार्यावर परतल्या.
मासेमारी नौका आपापल्या ठिकाणच्या बंदरांवर परतल्यानंतरही, पुढील आठवडाभर सहाय्यक मत्स्य विभागाची गस्ती नौका समुद्रात गस्त घालत असते. बंदी कालावधीत समुद्रात मासेमारी करणार्या नौकांना धोका असतो. अशा नौकांवर कारवाई देखील केली जाते. परंतु आता ही गस्ती नौका रविवारपासून बंदरात थांबणार आहे, म्हणजेच या गस्ती नौकेची गस्तच बंद होणार आहे. यावर्षी, हवामानातील बदलामुळे आणि मत्स्य विभागाच्या सतर्कतेमुळे, बंदीच्या काळात अवैध मासेमारीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.