

रत्नागिरी : दहावीचा निकाल जाहीर झाला असून अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांची आतापासूनच धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून दहावी उत्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानुसार १४१ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान या तीन शाखेसाठी तब्बल २५ हजार ८७० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. भाग एक अर्ज भरून आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार २४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून काही जागा रिक्त्त पडण्याची शक्यता आहे.
दहावी परीक्षा १७ हजार २१ विद्यार्थ्यांनी दिली होती. अखेर नुकताच निकाल जाहीर झाला असून १६ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्याचा निकाल ९७.३७ टक्के इतका लागला आहे. अकरावी प्रवेशासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने तयारी सुरू झालेली आहे. अर्जातील भाग एक भरण्याची सुविधा १० एप्रिलपासून सुरू केली होती. त्यानंतर दोन भरण्याची सुविधा अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.
यावर्षी प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींसाठी विशेष पाचवी फेरी होणार आहे. विद्यार्थ्याला एकाचवेळी भाग दोनसाठी (कोटा) अर्ज करता येईल. शून्य फेरीत अर्जाचा भाग एक आणि दोन भरण्याची मुदत १३ मेपर्यंत आहे. त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी १५ मे रोजी प्रसिध्द होईल. व्यवस्थापन कोट्यासाठी शून्य फेरीतील जागा वाटप -१८ आणि १९, तर पहिल्या फेरीसाठी जागा २० मे रोजी जाहीर होणार आहेत.