

पलूस : विसर्जन मिरवणुकांच्या निमित्ताने बुधवारी (ता. 3) रोजी रात्री पलूस शहरात ध्वनिबंदीचा फज्जा उडाला. शासनाने घालून दिलेले नियम व ध्वनिमर्यादा धाब्यावर बसवून दहा-पंधरा डीजेच्या कर्णकर्कश आवाजात विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्या. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही डीजेचा दणदणाट थांबवण्याऐवजी पोलिस प्रशासन मूकदर्शक बनून उभे राहिले. परिणामी नागरिकांचा रोष शिगेला पोहोचला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्याने गेलेल्या या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने तरुण डीजेच्या तालावर नाचत होते. डीजेच्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांचे अक्षरशः हाल झाले. कर्णकर्कश आवाजामुळे घरातील भांडी पडली, काचा फुटल्या, व्यापारी त्रस्त झाले. ध्वनी प्रदूषणामुळे रुग्णालयातील रुग्ण व अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना त्रास झाला. याच मिरवणुकीदरम्यान एका तरुणाने तोंडात रॉकेल घेऊन हवेत जाळ करण्याचा प्रयोग केला. मात्र अचानक रिअॅक्शन झाल्याने तो बेशुद्ध पडला. यावेळी पोलिस शशिकांत माळी यांनी तत्परतेने धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्याचा जीव वाचला असे माळी यांनी सांगितले. या घटनेने अशा धोकादायक प्रथांचा व ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी अनेक मंडळांनी ध्वनिमुक्त, नशामुक्त उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला होता. त्यांनी व्याख्याने, कथा, स्पर्धा यांसारखे प्रबोधनपर उपक्रम घेतले. या मंडळांचे नागरिकांनी कौतुक केले. पण दुसरीकडे बहुसंख्य मंडळांनी डीजेच्या दणदणाटाने वातावरण हादरवले. प्लास्टिकच्या कागदांचा वर्षाव व लेसर किरणांच्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला. नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र पोलिस प्रशासनाने केवळ सांगतो, बघतो अशी उत्तरे दिली. परिणामी पलूसमध्ये पोलिस आहेत का नाहीत? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.