

दापोली : दापोली-खेड मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक माल भरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका मालवाहू गाडीचा व्हिडिओ आणि बातमी प्रसिद्ध होऊनही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मालवाहतूकदारांकडून नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे.
रविवारी पुन्हा एकदा क्षमतेपेक्षा अधिक माल भरून वाहतूक करणारी गाडी निदर्शनास आली. अशा धोकादायक वाहतुकीमुळे दापोली-खेड मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्याने वाहनावरील नियंत्रण सुटण्याची, माल रस्त्यावर पडण्याची किंवा अन्य वाहनांना धडक बसण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारांबाबत वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एखाद्या अतिभारित मालवाहू वाहनामुळे मोठा अपघात घडून जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल नागरिक आणि वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित वाहतूक विभागाने अशा वाहनांची तपासणी करून क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.