

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, जिल्ह्यात ‘ऑक्टोबर हिट’चा परिणाम वाढत असून दिवसा कडक उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असून, रत्नागिरीकर घामाने हैराण झाले आहे. रविवारी तापमान 34 अंश सेल्सिअस गेले होते. दिवसा कडक उन, सायंकाळी ढगाळ वातावरण रात्री उकाडा आणि पहाटे जोराची थंडी जाणवत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार महिन्यात पावसाने दमदार बॅटींग केली आहे. त्यानंतर आता पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. गुरूवारी रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटात परतीचा पाऊस झाला. या पावसामुळे वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर अनेकांच्या घरांच्या, वाचनालयाच्या, दुकानांचे पत्रे उडून गेले. लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उकाडा जाणवत आहे. दुपारी कडक उन्हामुळे घामाच्या धारा वाहत आहेत. रत्नागिरीकर डोक्यावर टोपी, तोंडावर रूमाला, डोळ्यावर गॉगल घालून बाहेर पडत आहेत. दुसरीकडे भर उन्हात शेतकर्यांकडून भात कापणीला वेग आला आहे. पावसापूर्वी भात कापणी करण्यासाठी शेतकरी लगबग करीत आहे. पुढील काही दिवसात तापमान 33 अंशाच्या पुढेच असणार आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात पुन्हा परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘ऑक्टोबर हिट’मुळे रत्नागिरीकर हैराण होत आहे. त्यामुळे लिंबू शरबत, उसाचा रस, आईसस्क्रीम यासह विविध थंड पेयाकडे नागरिक वळत आहेत. विविध दुकानात थंडपेय पिण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.