

रत्नागिरी : रत्नागिरीतील राजीवडा समुद्र किनारी ठिकठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले आहे. त्याचबरोबर या समुद्रकिनारी नादुरुस्त आणि बंद पडलेल्या मच्छीमार नौका आणि सुट्टे भाग टाकून ठेवले असल्याने राजीवड्यात समुद्रातील नौका जेटीवर घेऊन जाणे-येणे जिकीरीचे झाले आहे. या संदर्भात सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, महाराष्ट्र सागरी मंडळाकडे नूर मच्छीमार संघटनेने तक्रार देऊनही गेल्या दोन महिन्यांत कोणतीच कारवाई झालेली नाही.
राजीवडा जेटीवरुन अनेक मच्छीमार नौका मासेमारीसाठी समुद्रात जातात. समुद्रात जाणार्या अशा मच्छीमार नौकांवरील खलाशी, पागी, तांडेलसह इतर कामगारांना रेशन, पाणी, बर्फ, नौकांचे इंधन नेवून द्यावे लागते. परंतु या मार्गातील किनार्यावर अनेक तुटक्या-फुटक्या नौका टाकून ठेवण्यात आल्या असल्याने ही सर्व रसद नौकेत घेऊन जाणे अडचणीचे होते. त्याचबरोबर मासेमारी करून आलेल्या नौकांवरील मासळी उतरवण्यासही मिळत नाही.
राजीवड्यातील या अडचणीकडे नूर मच्छीमार संघटनेने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, महाराष्ट्र मंडळचे सह बंदर निरीक्षक यांच्याकडे तक्रार देवून कारवाईची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही अद्याप कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. राजीवड्यातील हबीबुल्ला दर्गाच्या मागे जेटीवर छोटे मच्छीमार नौका उभ्या करून मासळीची विक्री करतात. परंतु या ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी समुद्रात मातीचा भराव टाकून अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या छोट्या मच्छीमारांची मच्छीविक्री करताना गैरसोय होते. आत्ताच कारवाई झाली नाही तर भविष्यात जेटीवर नौका उभ्या करणेही शक्य होणार नाही, याकडे नूर मच्छीमार संघटनेने आपल्या लेखी तक्रारीतून लक्ष वेधले आहे.