

रत्नागिरी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे ठाम आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. मराठा समाजाला मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचनेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. कोणत्याही समाजाच्या तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार सर्व समाजांना न्याय देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारवर होणार्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. मंत्रिमंडळात गँगवॉर असल्याच्या आरोपांना त्यांनी तथ्यहीन म्हटले असून यापूर्वी विरोधकांनी केलेले राजकीय भाकीत खरे ठरले आहे का? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकणार असे म्हटले होते, पण ते जिंकले का? या आरोपांवर लक्ष केंद्रित होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे निराधार आरोप केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील समन्वयाबद्दल बोलताना सामंत म्हणाले, त्यांच्यात कोणताही वाद नाही. आमच्यातील युतीमध्ये समन्वय नाही, ही केवळ विरोधकांकडून पसरवली जाणारी अफवा आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर केलेल्या वक्तव्यावर टीका करताना ते म्हणाले की, यावर आक्षेप घेणे म्हणजे देशभक्तीवर आक्षेप घेण्यासारखे आहे. अशा पद्धतीची टीकाटिपणी करणे हाच देशद्रोह आहे.