

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच डायलेसीस युनिट कोणत्याही परिस्थिती बंद पडू देणार नाही. हे युनिट चालवणाऱ्या एचएलएल कंपनीला ती युनिट चालवणे जमणार नसेल तर जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही युनिट सुरू ठेवेल. या कंपनीला चालवायचे नसेल तर त्यांना जिल्ह्याबाहेर एक मशिनही हलवू देणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये डायलेसीस युनिट सुरु असून त्या ठिकाणी १,३१३ जणांचे डायलेसीस सुरू असून ११,७५० वेळा या रुग्णांनी डायलेसीस केलेले आहे. त्या व्यतिरिक्त जिल्ह्यात ५ ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांमध्ये डायलेसीस युनिट सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही युनिट बंद होती. लांजा येथे असणारे युनिट आमदार किरण सामंत यांनी केलेल्या प्रयत्नामुळे सुरू झाले आहे. हे युनिट चालवणारे एचएलएल कंपनीने आता आठ दिवसांची मुदत मागितली आहे. आठ दिवसांनंतर त्यांना डायलेसीस युनिट चालवणे जमणार नसेल तर जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या मदतीने ही युनिट चालवेल. या युनिटच्या पगारासाठी वर्षभराचा खर्च सुमारे ३० लाखांच्या आसपास आहे. यासाठी सीएसआर फंडातून किंवा आऊटसोर्स करून ही यंत्रणा सुरू केली जाईल. या खर्चासाठी काही फंड सीएसआरमधून उभारला जाईल, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात असणारी ही पाचही युनिट कंपनीला चालवायची नसतील तर ती जिल्ह्याबाहेर नेऊ दिली जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मशिनवर सध्या स्थानिक टेक्निशियन असल्याने त्याचा फायदा येथील रुग्णांना मिळेल, असेही पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.सिंधुरत्न योजनेच्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. आठ ते दहा कोटीची कामे निधी देऊनही झाली नव्हती. ही कामे रद्द करण्यात आली असून नवीन कामे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे येणारे सरसकट प्रस्ताव पहिल्या स्तरावर तपासले जातील, त्यानंतर छाननी करून योग्य प्रस्ताव समितीकडे येऊन त्या बाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात बचत गटांच्या महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून त्रास दिला जात असून जिल्हाधिकारी याबाबत सोमवारी बैठक घेणार आहेत. त्यानंतर आपण स्वत: बैठक घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न.प.चा घनकचरा प्रकल्प नसल्यानेच पहिला क्रमांक हुकला
रत्नागिरी नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प नसल्यानेच राष्ट्रीय पातळीवर पहिल्या क्रमांक हुकल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. येथील घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.