

रत्नागिरी : निवळी-गणपतीपुळे मार्गावरील एका वळणावर गेले चार दिवस एक ट्रक बंद स्थितीत उभा आहे. यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच येथे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी मात्र या गोष्टीकडे बघ्याची भूमिका घेतली आहे.
निवळी-गणपतीपुळे हा मार्ग नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. जिंदाल कंपनीकडील जाणारी अवजड वाहने भरधाव वेगाने याच मार्गावरून जातात. त्याचबरोबर गणपतीपुळे येथे जाणारे पर्यटकही या मार्गाचा अवलंब करतात. यामुळे या रस्त्यावरून जाणार्या वाहनांची संख्या जास्त आहे. सध्या या मार्गावर निवळी जवळच एका अवघड वळणावर अवजड ट्रक बंद स्थितीत शुक्रवारपासून असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. अवघड वळणावरच बंद पडल्याने काहीवेळा वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. त्याचबरोबर तेथे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. जेथे हा ट्रक बंद पडला आहे, त्याच्या पुढील वळणावर हे वाहतूक पोलिस उभे राहून वाहनांची तपासणी करत आहेत. त्याचबरोबर या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे काम करत आहेत.