Nilesh Rane : उपमुख्यमंत्री शिंदेंमुळेच राजकारणात सक्रिय

चिपळूण येथील शिवसेना मेळाव्यात आमदार नीलेश राणे यांचे प्रतिपादन
Nilesh Rane
Nilesh Rane
Published on
Updated on

चिपळूण शहर : राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आज मी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालो आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारीचा शब्द देऊन मालवण-कुडाळ मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मदत केली. त्यामुळेच मी दहा वर्षांनंतर राज्याच्या सभागृहात आमदार म्हणून सक्रिय झालो आहे, अशा भावना शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी रविवारी व्यक्त केल्या.

चिपळुणात रविवारी राधाताई लाड सभागृहात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी समर्थकांसह आ. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. राणे म्हणाले की, आज परिमल भोसलेसारख्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या चिपळुणातील असंख्य कार्यकर्त्यांमुळे मी अनेक संघर्षातून ठामपणे उभा राहात आहे. राणे कुटुंबीयांवर मनापासून सर्वस्व झोकून प्रेम करणारे कार्यकर्ते असल्याने कधीही अन्याय व संघर्षाला आम्ही घाबरलो नाही. ज्या-ज्या वेळी संघर्षाची वेळ येते, त्यावेळी आमच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळते. मात्र, अशा कार्यकर्त्यांना आपण काही देऊ शकलो नाही किंवा त्यांनी आपल्याकडे काहीही मागितले नाही. राजकारणात काम करीत असताना ते केवळ निवडणुकीपुरतेच ठेवावे. निवडणूक झाल्यावर विकासकामे व समाजहिताचा विचार करावा. अशी कामे करणारा राजकारणात नेहमीच यशस्वी होतो.

जनतेला राजकारणाबद्दल काही देणेघेणे नसते. मात्र, त्यांची कामे झाल्यास निवडणुकीत तुमचा बूथ जरी नसला तरी जनता तुम्हाला मतदान करते. ही बाब कायम लक्षात ठेवून शिवसेनेतील जि. प., पं.स. व नगर परिषदेत निवडून गेलेल्या उमेदवारांनी यापुढे आता जनतेच्या कामाचे व्हिजन ठेवावे. विकासाची एक निश्चित दिशा ठरवून त्यानुसार काम करावे. चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण आहे. सांस्कृतीक, सामाजिक, क्रीडानगरी म्हणून ओळख आहे. त्यात अधिक विकासात्मक भर कशी पडेल याचा निवडून आलेल्यांनी विचार करावा. विकासासाठी प्रकल्प अहवाल, प्रस्ताव तयार करा. नगरविकास खात्याचे मंत्री आपले नेते आहे. मीही सभागृहात आहे. त्याचा पाठपुरावा मी करीन.

महामार्ग उड्डाण पुलासंदर्भात 2025 मध्येच या पुलाची लांबी वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून त्याबाबत अंदाजपत्रकासहीत पुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो संबंधित विभागाकडे पाठवून झाला आहे. त्याला आता अंतिम स्वरूप येईल आणि प्रांत कार्यालयापासून पाग विश्रामगृहापर्यंत उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होईल. मी कामकाजाची पद्धत बदलली आहे. पूर्वीच्या आणि आत्ताच्या पद्धतीत फरक आहे. जनतेच्या विकासकामे आणि हिताचा विचार करून मी काम करत आहे. मात्र, माझी पूर्वीची कामाची पद्धत विसरलो नाही. जर कुणाला पूर्वीच्या कामाच्या पद्धतीची आठवण आली तर ती करून देण्याची आपली तयारी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंब ज्या पद्धतीने जनतेच्या हिताची कामे करीत आहे त्याच पद्धतीने येथेही काम होणे अपेक्षित आहे. पालकमंत्री सामंत यांचेदेखील आपल्याला नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळते. परिमल भोसले यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना संघटनेतून योग्य तो सन्मान निश्चितच मिळेल. याची जबाबदारी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्यावर आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी विकासाचे धोरण ठरवावे. जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला आहे. विजयाच्या शर्यतीत आम्ही जी नावे ऐकली त्या सर्वांना चितपट करीत तुम्ही विजयी झालात. त्यामुळे जनतेचा विकास संपादन करण्यासाठी कामे करा. सर्व सहकार्य देण्यास आम्ही तयार आहोत, असेही आ. राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news