

रत्नागिरी : रत्नागिरीच्या वैभवात भर घालणारा आणखी एक प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे रविवारी 11 मे रोजी लोकार्पण होत आहे. सुमारे 17 कोटी 50 लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प निर्माण एन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या सव्वा वर्षांत या स्थानकाचे बांधकाम पूर्ण करून दिले आहे. तत्पूर्वी सुमारे पाच वर्ष हे काम रखडले होते.
पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून रत्नागिरीत अनेक स्वप्नवत प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तारांगण, शिवसृष्टी, थ्रीडी मल्टी मीडिया शोसह अनेक प्रकल्पांमध्ये आता नव्या मध्यवर्ती बसस्थानकाची भर पडली आहे. या बसस्थानकाचे काम जिल्ह्याबाहेरील एका कंपनीला मिळाले होते. परंतु, विविध कारणांमुळे हे काम रखडले गेले होते. पालकमंत्री उदय सामंत आणि आ. भैया सामंत यांनी हे काम स्थानिक निर्माण एन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळवून दिले. त्या नंतर अवघ्या सव्वा वर्षात हे काम पूर्णत्वास गेले आहे. पालकमंत्री स्वत: या कामाच्या ठिकाणी भेटी देऊन लवकरात लवकर बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू व्हावे, यासाठी झटत होते. ही प्रतीक्षा आता संपली असून, रविवारी या मध्यवर्ती बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा होत आहे.
रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाच्या तळ माळ्यावरून शहरी बससेवा चालणार आहे, तर पहिल्या माळ्यावरून मुंबई-पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बससेवेसाठी ग्रामीण बसस्थानक आहे. तळमाळ्यावर 18 आणि पहिल्या माळ्यावर 6 गाळे आहेत. संपूर्ण बसस्थानकात दोन कँटिन, दोन पोलिस चौक्या, दोन आरक्षण खिडक्या, दोन स्वच्छतागृहांसह विश्रांतीगृह, पार्सल आणि कंट्रोल रूमची व्यवस्था आहे. या अद्ययावत बसस्थानकामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून प्रवाशांना ऊन-पावसाचा जो त्रास होत होता तो संपला आहे.