

मंडणगड : अरबी समुद्र व सावित्री नदीच्या संगमावर वसलेल्या मंडणगड तालुक्यातील बाणकोट बंदराचा विकास आजही उपेक्षित आहे. जलवाहतुकीच्या काळात समृद्ध असलेला तालुक्याचा व्यापार उदीममुळे निर्माण झालेली समृद्धता आजच्या रस्ते मार्गाच्या काळात मात्र हरपली. पोतुर्गीज व ब्रिटिशांच्या काळातील कोकणातील पहिले व्यापारी बंदर असा लौकिक तालुक्यातील बाणकोट बंदराचा होता. दुर्लक्षित झाल्यामुळे येथील बंदरे अविकसित राहिली, किनारपट्टीवरील व्यवसायांची घडी विस्कळीत झाली. मासेमारी व्यवसाय, जलप्रवास व व्यापारी दृष्टीने येथे नव्याने समृद्धता निर्माण होण्यासाठी येथील बंदर विकास अत्यंत आवश्यक आहे.
बंदरांच्या विकासामुळे व्यापार उदीम रस्तेमार्गाच्या तुलनेत सुलभपणे साधता येवू शकतो, तालुक्यात किनारपट्टीवर बॉक्साईट खनिजाचे मुबलक साठे आहेत. या खनिजाचा व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातीच्या दृष्टीने करायचा झाल्यास बंदरे विकसित करून जेटी व त्यासबंधी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय तालुक्यात निर्माण होऊ शकणारे प्रकल्प उद्योग यासाठीसुद्धा जलवाहतूक हा पर्याय अधिक सोयीचा ठरू शकतो. पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणारा कोकण सागरी महामार्ग तालुक्यातील वेळास येथून जात असल्याने येथील किनारपट्टीवर पर्यटनही वाढू शकते. येथील किनारपट्टी मासेमारी आणि स्थानिक व्यापारासाठी महत्त्वाची आहे. परंतु, सध्या मंडणगड परिसरात बंदराचा म्हणावा तेव्हडा विकास झालाच नाही, येथे मोठे किंवा आधुनिक बंदरही नाही. किंबहुना लालफितीच्या कारभारात तसे प्रयत्नही झाले नाहीत. तालुक्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी आणि पर्यटनावर अवलंबून आहे. स्थानिक मच्छीमार मासेमारीसाठी छोट्या जेट्टी किंवा नैसर्गिक किनार्यांचा वापर करतात. बंदरे विकसित केल्यास मच्छिमारांना मासे साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज, मालवाहतूक सुविधा आणि बाजारपेठेपर्यंत जलद पोहोचण्याची सुविधा मिळू शकते. स्थानिक मच्छिमारांना मोठ्या जहाजांचा वापर करून खोल समुद्रातील मासेमारी करणे शक्य होईल. बंदराच्या विकासामुळे मत्स व्यापाराला अधिक चालना मिळू शकते व कोकणातील इतर बंदरांप्रमाणे मंडणगड येथेही मालवाहतूक व निर्यातीच्या संधी निर्माण होऊ शकतात .
पूर्वी सावित्री खाडी व अरबी समुद्रमार्गे जलवाहतूक चालत असे. पूर्वीच्या एकत्रित रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट ते बांदा असा उल्लेख नेहमी आढळतो, रत्नागिरी जिल्ह्याला 221 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून त्यात 11 प्रमुख बंदरे आहेत, त्यामध्ये तालुक्यातील बाणकोट बंदराचा समावेश करण्यात आला आहे. वेळोवेळीच्या राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे येथील बंदर विकास झाला नाही. तालुक्यातील सावित्री नदीच्या किनारपट्टीवर अनेक गावे वसली असून येथील मच्छिमार व्यावसायिक खाडी व अरबी समुद्रात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. किनारपट्टीवर बंदरलगतच्या सुखसोई, सुसज्य जेटी, प्रवासी निवारे, धूपप्रतिबंधक बंधारे, संरक्षण भिंत आदी विकासाची कामेही अपेक्षित आहेत.
सद्याचे बंदर विकासमंत्री नितेश राणे हे कोकणातले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून किनारपट्टीवरील नागरिकांच्या विकासाप्रती अपेक्षा वाढल्या आहेत. 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी मच्छीमारांच्या समस्या व कोकणातील बंदर विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयाचे येथील मच्छीमार व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. त्यांचा मासेमारीस कृषीचा दर्जा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला गेला.