

रत्नागिरी : रत्नागिरीत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचा (एनडीआरएफ) कायमस्वरूपी तळ उभारला जाईल. या द़ृष्टीने प्रस्ताव तयार करून पाठवा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत दिले. त्यांनी दिले. एनडीआरएफ तळासाठी आवश्यक जागा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
पालकमंत्र्यांनी या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील विविध विभागांच्या तयारीची माहिती घेतली आणि आवश्यक निर्देश दिले. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांच्या अधिकार्यांची कानउघाडणी केली. कामात सुधारणा करण्याचे आणि नागरिकांना सुविधा देण्याचे आदेश त्यांनी दिले.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, गोठे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावे, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, वीज वितरण, धरणे, खते, बियाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, धोकादायक शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा, नद्यांमधील गाळ काढणे, औषध साठा, आरोग्य सुविधा, पूल, नगरपालिका प्रशासन, पोलिस विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आढावा घेतला.
पालकमंत्री म्हणाले की, ज्या ठिकाणी 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तेथे नैसर्गिक आपत्तीच्या नियमांनुसार नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे अधिकार्यांनी तत्काळ कार्यवाही करावी. आरोग्य विभागाने साथीचे रोग आणि सर्पदंश यावर आवश्यक औषधसाठा तयार ठेवावा. शवविच्छेदन अहवाल तातडीने सादर करावेत. मदतीपासून कोणीही वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी.
कामात टाळाटाळ झाल्यास किंवा गैरव्यवहार आढळल्यास, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. कोकण रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवावेत, तसेच स्टेशनवरील गळके पत्रे तातडीने बदलावेत. एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी बसस्थानके स्वच्छ ठेवण्याची आणि विशेषतः स्वच्छतागृहे व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत आणि चिखल साफ करावा. नवीन पत्र्यांचा वापर करून बस थांब्यांचे शेड तत्काळ उभे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. महावितरण विभागाने वाड्या-वस्त्यांचे सर्वेक्षण करून सिंगल फेजवरून थ्री फेजमध्ये वीज जोडणी देण्याचे काम हाती घ्यावे. धरण लाभक्षेत्रात राहणार्या लोकांची माहिती ठेवावी आणि आपत्कालीन परिस्थितीत किती लोकांचे स्थलांतरण करावे लागेल, याचे नियोजन करावे. दरडग्रस्त भागांसाठी योग्य नियोजन करावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
चांगल्या शाळा निवारा म्हणून वापरण्यासाठी तयार ठेवाव्यात. अतिधोकादायक आणि धोकादायक शाळांची यादी तयार करून सादर करावी, जेणेकरून त्यांची दुरुस्ती प्राधान्याने करता येईल, असेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाने शेतकर्यांच्या बांधावर खते आणि बियाणे देण्यासाठी यंत्रणा तयार करावी. याबाबत जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.