

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे नेते सुहास ऊर्फ कुमार शेट्ये यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांना रत्नागिरीत आणण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते कार्यरत होते. त्या पूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी शिरगावमध्ये काँग्रेस रुजवण्याचे काम केले. शिरगावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रत्नागिरीत आणण्यात आले होते. शुक्रवारी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजपा, काँग्रेसमधील पदाधिकार्यांनी रुग्णालयात व त्यांच्या घरी धाव घेतली. अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांना ओळखले जात होते. सर्व पक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना ज्येष्ठ नेते म्हणून जिल्ह्यात ओळखले जात होते.
कुमार शेट्ये यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर शिरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यातून नागरिकांनी येऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते खा. शरद पवार यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही ते खा. पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते.