

चिपळूण ः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवून 90 हजार मते घेतलेले प्रशांत यादव यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. मुंबईत नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यासात दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.
यावेळी खासदार नारायण राणे, मस्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे अनेक मुस्लीम कार्यकर्ते देखील यावेळी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपात दाखल होणार आहेत. खेर्डीचे सरपंच म्हणून प्रशांत यादव यांची सुरू झालेली राजकीय कारकिर्द आता चिपळूण मतदारसंघाचे नेते म्हणून पुढे आली. महायुतीचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात लढताना यादव यांनी 90 हजार मते घेतली. केवळ 6 हजार 800 मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र, आता ते सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे ते महायुतीतील महत्वाच्या पक्षात सामील होत असून त्यांना भाजपात मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्लासाठी भाजपला नव्या नेतृत्वाची गरज आहे. यामुळे यादव यांच्या पक्षप्रवेशाला अधिक महत्व आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. विकास कामांना गती मिळावी व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने आपला पक्षप्रवेश करत असल्याचे प्रशांत यादव यांनी सांगितले.