

राजेश चव्हाण
रत्नागिरी : श्रावण मासात कोकणातील निसर्ग सौंदर्य आपल्या भरात असते. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील सापुचेतळे शिरगाव शिवरेवाडीतील, मालगुंड वरवडे येथील खालचे कपाळ तसेच कोकणातील अनेक ठिकाणी परिसरातील कातळसड्यांवर रानफुलांची रंगबेरंगी फुलांची चादर पसरली आहे. तिरड्यांची रानफुले, कारवी, टोपली कारवी, निळपुष्पी, सडसडी, दीपकाडी, सोनकी, जांभळीपुष्पी आणि सोनतळ यांसारख्या फुलांनी हे कातळसडे सजले आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने येत असून, सडयांवरील रस्त्यावरच वाहने थांबवून सेल्फी घेत आहेत.
या रानफुलांचे केवळ सौंदर्यच नव्हे, तर औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदात कारवी, सोनकी आणि दीपकाडी यांचा उपयोग श्वसनविकार, त्वचारोग आणि ज्वर यांसाठी केला जातो. श्रावणमासातील विविध सणांमध्ये या फुलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः नागपंचमी, श्रावणी सोमवार, पिठोरी अमवस्या, हरतालिका या सणाात तसेच गणेशोत्सव, गौरी यांसारख्या सणांमध्ये या फुलांचा वापर पूजेसाठी होतो. स्थानिक ग्रामस्थ ही फुले गोळा करुन बाजारात विक्रीसाठी आणत असतात आणि या फुलांना बाजारात मोठी मागणी असते. या मधून चांगली आर्थिक उलाढाल होत असते.
पावसाळ्यात कोकणातील कातळसडे हिरव्या शालूने झाकले जातात आणि त्यावर रानफुलांची उधळण म्हणजे निसर्गाचा रंगोत्सवच. या दृश्यामुळे संपूर्ण परिसरात एक अलौकिक शांतता आणि सौंदर्य निर्माण होते. देशभरातच नव्हे तर विदेशातील पर्यटकांसाठी श्रावण मासातील फुललेले रंगबिरंगी सडे एक आकर्षण ठरत आहे. ठिकठिकाणाहून पर्यटक या सडयावरील आकर्षक रंगाची उधळण पाहण्यासाठी येत असातत तसेच वनस्पती प्रेमीही या कलावधीत या फुलांचा अभ्यास करण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर येत असतात.
या कातळसड्यांवर बेसुमार चिरेखणी आणि मानवी हस्तक्षेपामुळे रानफुलांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होत आहे. स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हे कातळसडे केवळ सौंदर्यस्थळ नाहीत, तर जैवविविधतेचे संवेदनशील केंद्र आहेत. स्थानिक नागरिक आणि पर्यटक या द़ृश्याने भारावून गेले आहेत. हे द़ृश्य म्हणजे निसर्गाने कोकणावर केलेली मुक्तहस्ताची उधळण आहे, असं पर्यटक सांगतात. काही स्थानिकांनी या फुलांवर आधारित हस्तकला वस्तू, औषधी अर्क आणि माहितीपत्रके तयार करण्यास सुरुवात केली आहे.