Ratnagiri News| नाटे-रत्नागिरी मार्गावर वडाप वाहतुकीचा ‌जीवघेणा वेग

काही चालकांच्या बेदरकारपणामुळे प्रवाशांच्‍या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्‍हा एकदा ऐरणीवर
jeep vadap vahatuk
जीप वडाप वाहतूक File Photo
Published on: 
Updated on: 

नाटे : नाटे ते रत्नागिरीदरम्यान धावणाऱ्या सुमो आणि जीप वडाप वाहतुकीतील काही चालकांचा वाढता बेदरकारपणा सध्या प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील इतर नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. ग्रामीण भागातील दळणवळणाचा कणा मानल्या जाणाऱ्या या वाहतुकीत प्रामाणिक चालकांची संख्या मोठी असली तरी मोजक्या चालकांच्या अतिवेगामुळे संपूर्ण मार्गावर अपघातांची भीती वाढली असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

नाटे-पावस-रत्नागिरी हा मार्ग अनेक ठिकाणी वळणावळणांचा, अरुंद आणि चढ-उतारांचा आहे. यापूर्वीही कोकणातील अंतर्गत मार्गांवर वडाप गाड्यांचे ओव्हरलोडिंग, तीव्र वळणावर ओव्हरटेकिंग आणि अतिवेगामुळे अनेक गंभीर अपघात घडले आहेत. काही प्रसंगांत निष्पाप प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले तर काहींना जीवही गमवावा लागला आहे. अशा घटना ताज्या असतानाही काही वडाप चालक पूर्वीच्या घटनांमधून कोणताही धडा घेताना दिसत नाहीत. फेऱ्या वाढवण्याच्या घाईत अवाजवी वेग गाठणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय आणि चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह लक्षात घेऊन पोलिस व वाहतूक प्रशासन अनेकदा या वाहतुकीकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहते. हातावर पोट असणाऱ्या प्रामाणिक चालकांच्या पोटावर पाय येऊ नये, हा त्यामागील उदात्त हेतू असतो. मात्र, या सहानुभूतीचा आणि मोकळीकीचा गैरफायदा काही बेजबाबदार चालक घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा परवाना कोणालाही मिळालेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

प्रामाणिक चालकांचे भवितव्य धोक्यात

या मार्गावर अनेक वर्षे अत्यंत संयमाने, वेगाचे भान ठेवून आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे चालकही सेवा देत आहेत. परंतु, मोजक्या तरुणांच्या बेदरकार स्टाईलमुळे संपूर्ण वडाप व्यवसायाची नाहक बदनामी होत असून प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यास प्रामाणिक व्यावसायिकांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनीही पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रवास करताना किंवा रस्त्यावरून जाताना एखादा चालक धोकादायक पद्धतीने गाडी चालवत असेल तर त्याला तत्काळ थांबवून शांततेने पण ठामपणे समज देणे गरजेचे आहे. चालकाचा वेग नियंत्रित ठेवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे आणि कारवाईचे सोपस्कार करण्यापेक्षा संबंधितांनी वेळीच शहाणपण दाखवणे गरजेचे आहे. वडाप चालकांनी आत्मपरीक्षण करून सुरक्षित ड्रायव्हिंग करावे, अन्यथा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावी लागतील, असा सूर नाटे परिसरातून उमटू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news