

चिपळूण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जातील; मात्र जिथे मी आहे तिथे भाजपाचाच नगराध्यक्ष असेल असा प्रयत्न करणार, असे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी चिपळुणात स्पष्ट केले. जनता दरबारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सहकार भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे त्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जातील. यात छोटा कोण, मोठा कोण हा प्रश्न नाही. महायुतीत मोठा भाऊ कोण? हे मी सांगण्यापेक्षा उर्वरित दोन भावांना विचारा. म्हणजे ते सांगतील असे सांगून त्यांनी खिल्ली उडवून दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ माझा आहे. या लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांची विकासकामे करणे आपले कर्तव्य असून जिथे मी आहे तिथे भाजपचाच नगराध्यक्ष कसा होईल यासाठी जरूर प्रयत्न करणार असेही खा. राणे म्हणाले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे हे विकृत आहेत. त्यांना दुसरे काम नाही. त्यांनी आजपर्यंत काय केले? असा सवाल केला. जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंतच शिवसेना होती, असे जाहीर भाषणात सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जास्तीत जास्त यश कसे मिळेल यासाठी आपण प्रयत्न करीत आहेात. निवडणुका आल्या म्हणून हा जनता? ? दरबार झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा येईन, असे खा. राणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रशांत यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.