

रत्नागिरी : आगामी निवडणुकांबाबत महायुतीविषयी पक्षाचे वरिष्ठच नेते निर्णय घेतील. तो निर्णय मी घेत नाही. पक्षहिताचे जे असेल त्याबाबत नेतेच निर्णय देतील. सिंधुदुर्ग असो वा अन्य कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री असो, तो म्हणजे सर्व नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी स्वबळाबाबत मत जाहीर करू नये. महायुतीबाबत पक्ष निर्णय देईल तेच होईल, अशी स्पष्ट भूमिका रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत खासदार राणे पुढे म्हणाले, मुंबई-गोवा मार्गाची डिसेंबर 2025 ची डेडलाईन पुढे जाईल. पाऊस अजून थांबत नाही. त्यामुळे कामात अडथळा येत आहे. मी दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून लवकरात लवकर महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत ठेकेदार कंपन्यांना सूचना दिली जाईल.
खासदार झाल्यानंतर या मतदार संघातील जनतेला भेटावे, त्यांच्या समस्या, प्रश्न, अडचणी समजून घ्याव्यात. जनतेच्या विकासकामांना निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी मी आलो. मी स्वतःहून आलो असून मला कोणी बोलावले नाही. केंद्र, राज्यात सरकारच्या जनहिताच्या ज्या योजना आहेत त्या योजनांबाबत नागरिक समाधानी असल्याचा प्रत्यय मला या दौर्यामध्ये आला. जिल्ह्यात जे रस्ते होत आहेत, त्या रस्त्यांच्या बाजूने उद्योग व्यवसाय व्हावेत, यासाठी मी आधी सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन चर्चा केली. जनतेचे प्रश्न अधिकार्यांनी ऐकावेत, त्यांच्या भावानांचा आदर करून जलदगतीने ते प्रश्न सोडवावेत. 6 ते 12 महिने प्रश्न सुटायला लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. हेतूपुरस्सर कोणीही अधिकारी कोणाचे काम अडवत नाही. अधिकार्यांचे काम अगदी चांगले सुरू आहे. जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावे, यासाठी सर्व विषयांची चर्चा केली. एका दिवसामध्ये मीदेखील समृद्धी आणू शकत नाही, परंतु लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे भातशेती, आंबा, काजूचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना भरपाई मिळेल का, यावर राणे म्हणाले, नुकसानीचा सर्व्हे होऊ दे त्यानंतर भरपाईबाबत निर्णय होईल. परंतु आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कलमांच्या बुंद्यांशी अजून ओलावा आहे, त्यामुळे मोहोर कमी प्रमाणात धरला जातो, तसेच फळ उशिरा धरले जाते. यावर माझाही अभ्यास आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असे खा. राणे म्हणाले,
महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत बोलताना खासदार राणे म्हणाले, कोणती महाविकास आघाडी, कोण काम करतं. जनतेचा एकतरी प्रश्न त्यांनी सोडवला आहे का. ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा ठाकरेंनी काय केले? त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही जिवंत आहे हे दाखविण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. निवडणुका आहेत म्हणून आपल्या पत्रावळीवर काही भाजी पडते का, यासाठी हा मोर्चा आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 80 टक्के निवडणुका महायुती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.