

कणकवली ः सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही झाले तरी आम्ही भाजप- शिंदे शिवसेना युती करण्याचे जवळपास ठरविले आहे. रविवारी याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय घेतील. ही युती व्हावी, असे मला वाटते. दोन्ही जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष बसावा, 80 टक्केपेक्षा जास्त जागा युतीने घ्याव्यात आणि युती झाल्यानंतर त्या येतील असा माझा विश्वास आहे. काहीजण राणे कुटुंबाबाबत बातम्या पसरवत आहेत; मात्र जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत राणे कुटुंंबाबत कोणताह वाद होणार नाही, आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग उपस्थित होते. सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे शिवसेना नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा केल्यानंतर तसेच कणकवलीत ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर खा. नारायण राणे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सिंधुदुर्ग-रत्नागिरीत भाजप- शिंदे शिवसेना यांची युती व्हायला हवी, आणि येत्या दोन दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होईल असे स्पष्ट केले.
खा. नारायण राणे म्हणाले, आपण गेली 35 वर्ष या जिल्ह्यात राजकारणात आहे. यामध्ये सर्वांनी मला चांगली साथ्ा दिली. आज दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी आपण बोलविले होते. युती व्हावी अशी कार्यकर्त्यांचीही इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांनी सिंधुदुर्गात भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे म्हटल्याकडे खा. राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पक्ष संघटनेबाबत पालकमंत्र्यांचे निर्णय अंतिम नाहीत, शेवटी पक्ष आहे. आपणही इथला खासदार आहे, युती व्हावी, असे माझे मत आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये एकत्र काम करीत आहेत. विधानसभा, लोकसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढविली, मग आता असं काय झालं की युती नसावी? कोणाला वाटतं म्हणून नाही तर वास्तव पाहिलं पाहिजे. निवडणूकीत जास्त जागा कोण निवडून आणणार, दोन्ही ठिकाणी आपला अध्यक्ष कसा बसेल हे भाजपने पाहिलं पाहीजे,असे खा. राणे म्हणाले.
युतीबाबत भूमिका स्पष्ट करताना खा. राणे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नीतेश राणे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेवून विचारपूस करायला हवी. कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घ्यायला हवी. खासदार, आमदारांची काय इच्छा आहे हे विचारायला हवे होते. केवळ कुडाळ- मालवण मतदार संघच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्गात युती व्हावी, असे आपले मत आहे. जागा वाटपाचा फॉर्मुला लवकरच ठरेल असे खा. राणे यांनी सांगितले.
कणकवली नगरपंचायत निवडणूकीत ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा सूरू असून शहर विकास आघाडी करून ही निवडणूक लढविण्याच्या हालचाली सूरू आहेत. राजन तेली यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. याबाबत खा. राणे यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता खा. राणे म्हणाले, तसे काही होणार नाही, परंतु तसे जर होत असेल तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे शिवसेनेशी संबंध तोडून टाकू, असा इशारा खा. राणे यांनी दिला.