Ratnagiri News| ‘माझा आदेश म्हणजे पक्षाचा आदेश’; ऑडिओने खळबळ

एसटी कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप; क्लिपची सत्यता अद्याप अस्पष्ट
Ratnagiri News
एसटी कर्मचाऱ्याला धमकी
Published on
Updated on

दापोली : दापोली तालुक्यात एका लोकप्रतिनिधीच्या नावाने चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये एसटी सेवेतील एका कर्मचाऱ्याशी आक्रमक आणि धमकीवजा भाषेत संभाषण करण्यात आल्याचे ऐकू येत असून, ‘माझा आदेश म्हणजे पक्षाचा आदेश’ असा उल्लेख केल्याचा दावा केला जात आहे.

कथित संभाषणात ‘उपरे-सुपरे आहेत, त्यांचा मी आदेश मानत नाही. हा माझा आदेश आहे,’ अशा आशयाचे वक्तव्य ऐकू येत असल्याची चर्चा आहे. तसेच गाडी रद्द केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, डेपोतून गाड्या बाहेर पडू देणार नाही आणि मोठे अधिकारी असले तरी आपण घाबरणार नाही, अशा स्वरूपाची कथित वक्तव्येही या क्लिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय, ‘माझा आदेश म्हणजे पक्षाचा आदेश आहे,’ असे सांगत संबंधित कर्मचाऱ्याच्या कंपनीचा करार रद्द करण्याचा इशारा दिल्याचेही क्लिपमध्ये ऐकू येत असल्याची चर्चा आहे. या कथित ऑडिओ क्लिपची समाजमाध्यमांसह दापोलीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, क्लिपमधील आवाज नेमका कोणाचा आहे, संभाषण कधी व कोणत्या पार्श्वभूमीवर झाले आणि क्लिपमध्ये फेरफार करण्यात आला आहे का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या क्लिपच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. संबंधित लोकप्रतिनिधी अथवा एसटी प्रशासनाकडून याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news