

खेड : खेड तालुक्यातील भरणे येथील मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच मालमत्तेवर दोन वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून कर्ज उचलून हा घोटाळा करण्यात आला. याप्रकरणी सुनील प्रभाकर सागवेकर (रा. समर्थनगर, भरणे) याच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल भिकाजी विचले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुनील सागवेकर याने भरणे येथील समर्थनगरमधील आपल्या मालकीच्या सदनिका पतसंस्थेकडे गहाण ठेवून कर्ज घेतले होते. मात्र, त्याच सदनिकांवर त्याने पुन्हा श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड, चिपळूण येथूनही कर्ज उचलले. ही बाब लक्षात आल्यानंतर पतसंस्थेने पोलिसांत धाव घेतली.
एकाच मालमत्तेवर दोनवेळा कर्ज उचलून सागवेकरने पतसंस्थेच्या विश्वासाचा भंग करत आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 28 फेब्रुवारी 2014 ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फसवणुकीमुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, खेड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.