देवरुखात मुंबईचा आंबा! नात्यांचा, मातीतल्या प्रेमाचा गोड सुगंध

कोकणात तर आंबा हा केवळ फळ नाही, तर भावना आहे, परंपरा आहे.
देवरुखात मुंबईचा आंबा! नात्यांचा, मातीतल्या प्रेमाचा गोड सुगंध
देवरुखात मुंबईचा आंबा! नात्यांचा, मातीतल्या प्रेमाचा गोड सुगंधfile photo
Published on
Updated on

'Mumbai Mango' in Devrukh! The sweet fragrance of relationships and a love rooted in the soil.

देवरुख पुढारी वृत्तसेवा :

आंबा” म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. फळांचा राजा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा लाडका. कोकणात तर आंबा हा केवळ फळ नाही, तर भावना आहे, परंपरा आहे, आणि माणसाच्या मातीशी जोडलेलं नातं आहे. मुंबई लालबाग येथे आंब्याच्या झाडाला लागलेले आंबे चक्क कोकणातील भाच्याला आणून दिले. कोकणातून मुंबईत आंबे पाठवले जातात. परंतु मुंबईत पिकलेला आंबा कोकणात दिला जातो अशी आश्चर्यकारक घटना देवरुखमध्ये घडली आहे.

देवरुखात मुंबईचा आंबा! नात्यांचा, मातीतल्या प्रेमाचा गोड सुगंध
Ratnagiri Sahitya Sammelan : राजे पकडले गेले नसते तर भारताचा नकाशा बदलला असता!

कोकणी माणूस जिथे जाईल तिथे आपल्या गावाकडचा आंबा सोबत नेतो, त्याची लागवड करतो आणि त्या चवीतून आपली ओळख जपतो. असाच एक भावनिक आणि हृदयस्पर्शी प्रसंग देवरुखात अनुभवायला मिळाला. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील वांझोळे-बावनदी येथील सूर्यकांत वाजे आणि त्यांचे भाचे सुधाकर कोटकर यांनी मुंबईतल्या झाडाचा आंबा थेट देवरुखात आणला तोही एसटीच्या प्रवासातून, कोणताही गाजावाजा न करता.

मुंबईत स्थायिक झालेल्या वाजे कुटुंबाच्या मातोश्रींनी आपल्या गावच्या आठवणी जपण्यासाठी काही वर्षांपूर्वी मुंबईत लालबाग येथे आंब्याचे झाड लावले. त्या झाडाची जपणूक झाली, ते वाढले, आणि कालांतराने त्याला गोड आंबे लागायला लागले. घरच्यांमध्ये वाटून, प्रेमाने खाऊन त्या आंब्याने मुंबईतही कोकणची चव जिवंत ठेवली.

देवरुखात मुंबईचा आंबा! नात्यांचा, मातीतल्या प्रेमाचा गोड सुगंध
Holi Festival Maharashtra: खेळताना रंग बाई होळीचा; शिमगा, लोकपरंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगोत्सवाची रंगत

काळाच्या ओघात सुधाकर कोटकर गोदरेज कंपनीतून निवृत्त होऊन पुन्हा गावाकडे देवरुखात स्थायिक झाले. यंदाच्या हंगामात मुंबईतील त्या झाडाला भरपूर आंबे लागले. नातेवाईकांत वाटप करून उरलेले आंबे सूर्यकांत वाजे यांनी खास भाच्यासाठी देवरुखात आणले.

मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दररोज कोट्यवधींची आंब्यांची उलाढाल होत असते. कोकणातून मुंबई-पुण्याकडे आंब्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. मात्र, या सगळ्या व्यापारी गडबडीत एक साधा पण हृदयस्पर्शी प्रवास घडला मुंबईतून कोकणात, देवरुखात “मुंबईचा आंबा” आला… तोही राजासारखा, पण कोणताही दिखावा न करता!

देवरुखातील साईनाथ कोल्ड्रिंक्स येथे या आंब्याचे स्वागत करण्यात आले. याक्षणी वाजे आणि कोटकर यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, अभिमान आणि आपल्या मातीतल्या आठवणींचं समाधान हेच त्या आंब्याचं खरं मूल्य होतं.

आजही अनेकांना वाटतं की कोकण म्हणजे फक्त हापूस. पण हा गैरसमज आहे. अस्सल कोकणी माणूस हापूससोबतच रायवळ, पायरी, खोबरी, रत्ना, भोपळी अशा विविध जातींच्या आंब्यांवरही तितकंच प्रेम करतो. पूर्वी घराघरांत फिरून करंडीतून रायवळ आणि पायरी विकणारे विक्रेते, हातावर रस देऊन चव दाखवणारी परंपरा ही सगळी संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे.

आज रायवळसारख्या स्थानिक आंब्यांकडे दुर्लक्ष झाल्याने ती झाडं लाकूड म्हणून वापरली जात आहेत. शासन आणि संशोधन संस्थांनी या पारंपरिक जातींकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

“आपल्या हौसेला मोल नसतं” हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुंबईतून एसटीने भाच्यासाठी आंबे घेऊन येणारा मामा, आणि त्या आंब्याचं प्रेमाने स्वागत करणारा देवरुखचा भाचा हीच कोकणच्या संस्कृतीची खरी ओळख आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर ते मुंबई या सर्व भागांना जोडणारा एकच गोड दुवा आहे… तो म्हणजे “आंबा”. आणि जोपर्यंत या आंब्यावर प्रेम करणारे हात आहेत, तोपर्यंत कोकणची ही गोड परंपरा कधीही मावळणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news